वृत्तसंस्था /कार्डिफ
यजमान इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत लंकेवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. गुरुवारी पावसाचा व्यत्यय आलेल्या या दुसऱया सामन्यात इंग्लंडने लंकेचा पाच गडय़ांनी पराभव केला. इंग्लंडच्या लिव्हिंगस्टोनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकेने 20 षटकात 7 बाद 111 धावा जमविल्या. लंकेचा डाव संपल्यानंतर पावसाचा अडथळा आल्याने इंग्लंडला पंचांनी 18 षटकात विजयासाठी 103 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. इंग्लंडने 16.1 षटकात 5 बाद 108 धावा जमवित हा सामना 11 चेंडू बाकी ठेवून पाच गडय़ांनी जिंकला. या मालिकेतील तिसरा सामना आज (शनिवार) साऊदम्पटन येथे होणार आहे.
लंकेच्या डावामध्ये कुसल मेंडिसने 39 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 39, कर्णधार कुसल परेराने 25 चेंडूत 21 तसेच उदानाने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 19 धावा जमविल्या. लंकेच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. लंकेच्या डावात 2 षटकार आणि 4 चौकार नोंदविले. इंग्लंडतर्फे मार्क वुड आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन तर सॅम करन आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये लिव्हिंगस्टोनने 26 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 29, सॅम करनने 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 16, बिलिंग्जने 29 चेंडूत 2 चौकारासह 24, कर्णधार मॉर्गनने 9 चेंडूत 2 चौकारासह 11, रॉयने 17 चेंडूत 2 चौकारासह 17, मलानने 1 चौकारासह 4 धावा जमविल्या. लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडची एक वेळ 4 बाद 36 अशी केविलवाणी स्थिती झाली होती. पण त्यानंतर लिव्हिंगस्टोन तसेच बिलिंग्ज यांनी समयोचित फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी केली. इंग्लंडच्या डावात 2 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे हसरंगाने 2 तर चमिरा, बी. फर्नांडो आणि उदाना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात सॅम करनने विजयी षटकार ठोकून लंकेचे आव्हान संपुष्टात आणले. संक्षिप्त धावफलक-लंका 20 षटकात 7 बाद 111 (कुसल मेंडिस 39, कुसल परेरा 21, उदाना नाबाद 19, वुड 2-18, आदिल रशीद 2-24, सॅम करन 1-8, जॉर्डन 1-31), इंग्लंड (18 षटकात 103 धावांचे नवे उद्दिष्ट) – 16.1 षटकात 5 बाद 108 (लिव्हिंगस्टोन नाबाद 29, बिलिंग्ज 24, रॉय 17, मॉर्गन 11, सॅम करन नाबाद 16, मलान 4, हसरंगा 2-20, चमिरा 1-29, बी. फर्नांडो 1-17, उदाना 1-25).