मालिकाविजय तिसऱया कसोटीत यजमानांची 269 धावांनी बाजी, वोक्सचे 5 बळी
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
ख्रिस वोक्स व स्टुअर्ट ब्रॉड यांच्या भेदक माऱयाच्या जोरावर इंग्लंडने विंडीजचा दुसरा डाव 129 धावांत गुंडाळून तिसरी कसोटी 269 धावांनी जिंकली आणि 2-1 अशा फरकाने मालिका जिंकून विस्डेन ट्रॉफी हस्तगत केली. 45 चेंडूत 62 धावा आणि दोन्ही डावांत मिळून 68 धावांत 10 बळी मिळविणाऱया ब्रॉडला सामनावीर तसेच मालिकावीर असा दुहेरी बहुमान मिळाला.
या तिसऱया व अखेरच्या कसोटीत इंग्लंडने विंडीजला 399 धावांचे विजयाचे आव्हान दिले होते. पण पहिल्या डावात खराब फलंदाजी करणाऱया विंडीजला हे आव्हान पेलवले नाही आणि शेवटच्या दिवशी उपाहारानंतर त्यांचा दुसरा डाव वोक्स-ब्रॉड यांच्या भेदक माऱयासमोर 37.1 षटकांत केवळ 129 धावांत आटोपला. शाय होप (31), ब्रुक्स (22), ब्लॅकवुड (23) या तिघांनाच विशी पार करता आली तर ब्रेथवेटने 19, कर्णधार होल्डरने 12 धावा केल्या. ख्रिस वोक्सने 50 धावांत 5 तर ब्रॉडने 36 धावांत 4 बळी मिळविले. ब्रॉडने या मालिकेतील दोनच कसोटीत मिळून 15 बळी मिळविले. पहिल्या कसोटीत त्याला वगळण्यात आले होते.
कोव्हिड 19 महामारीच्या ब्रेकनंतर झालेली पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा बहुमान इंग्लंडने मिळविला. आता पुढील आठवडय़ात त्यांची कसोटी मालिका पाकिस्तानविरुद्ध सुरू होणार आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता. पण तिसऱया दिवशीअखेर 2 बाद 10 अशी खराब सुरुवात करणाऱया विंडीजचा तेव्हाच पराभवही निश्चित झाला होता. शेवटच्या दिवशी उर्वरित फलंदाजांनी त्यात केवळ 119 धावांची भर घातली.
विश्वचषक सुपरलीग उद्यापासून
गुरुवारपासून इंग्लंड व आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. वर्ल्ड कप सुपरलीग क्रिकेटची ही पहिली मालिका असून 2023 मध्ये भारतात होणाऱया वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी सुपरलीग ही पात्रता लीग असणार आहे. या लीगमध्ये 13 संघांत मायदेशात व विदेशात अशा तीन सामन्यांच्या चार वनडे मालिका निर्धारित कालावधीत पूर्ण केल्या जाणार आहेत. यजमान भारतासह पहिले आठ संघ विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरतील. उर्वरित 5 संघ या लीगमधून निश्चित होणार आहेत. सामना जिंकणाऱया प्रत्येक संघास 10 गुण तर टाय झाल्यास 5 गुण दिले जातील. सामना रद्द झाल्यास तसेच पराभूत संघास एकही गुण दिला जाणार नाही. पाच संघ पात्रता मिळविण्यात अपयशी ठरल्यास त्यांना अन्य पाच संलग्न सदस्य संघांसमवेत 2023 मध्ये विश्वचषक पात्रता स्पर्धेत खेळावे लागणार आहे आणि यातील दोन संघांना विश्वचषकांत खेळण्याची संधी मिळणार आहे. विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 369, विंडीज प.डाव 197, इंग्लंड दु.डाव 2 बाद 226 डाव घोषित, विंडीज दु.डाव (टार्गेट 399) 37.1 षटकांत सर्व बाद 129 : ब्रेथवेट 19, होप 31, ब्रुक्स 22, ब्लॅकवुड 23, होल्डर 12, डॉरिच 8, चेस 7. गोलंदाजी : वोक्स 5-50, ब्रॉड 4-36, आर्चर 0-24, अँडरसन 0-18.