द.आफ्रिकेवर 189 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ केपटाऊन
इंग्लंडच्या गोलंदाजांचा कडवा प्रतिकार करणाऱया पीटर मलानला लवकर बाद केल्यानंतर इंग्लंडने अखेरच्या सत्रात द.आफ्रिकेचा दुसरा डाव 248 धावांत गुंडाळून इंग्लंडने दुसरी कसोटी 189 धावांनी जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. अष्टपैलू बेन स्टोक्सला सामनावीराचा बहुमान मिळाला.
द.आफ्रिकेला इंग्लंडकडून 438 धावांचे विजयाचे कठीण लक्ष्य मिळाले होते. चौथ्या दिवशीअखेर त्यांनी 2 बाद 126 अशी आशादायक सुरुवात केली होती. पण मंगळवारी शेवटच्या दिवशी डी कॉकचा अपवाद वगळता इतर फलंदाजांकडून फारसा प्रतिकार न झाल्याने त्यांचा डाव 137.4 षटकांत 248 धावांत आटोपला. आदल्या दिवशीचा नाबाद सलामीवीर मलान 84 धावा काढून बाद झाला. डी कॉकने नंतर रॉसी व्हान डर डुसेनसमवेत सहाव्या गडय़ासाठी 66 धावांची भर घातली. पण डी कॉक अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर बाद झाल्यावर द.आफ्रिकेचा डाव 6 बाद 237 वरून सर्व बाद 248 असा गडगडला. डी कॉकने 107 चेंडूंच्या खेळीत 7 चौकार मारले. स्टोक्सने फिलँडरला बाद करून इंग्लंडला मोठा विजय मिळवून दिला. स्टोक्सने या सामन्यात एकूण सहा झेल टिपले आणि या डावात 3 बळीही मिळविले. डेन्ली व अँडरसन यांनी प्रत्येकी 2, ब्रॉड, बेस व करन यांनी एकेक बळी मिळविला.
उभय संघांतील तिसरी कसोटी पोर्ट एलिझाबेथ येथे 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 269, द.आफ्रिका प.डाव 223, इंग्लंड दु.डाव 8 बाद 391 डाव घोषित, इंग्लंड दु.डाव 137.4 षटकांत सर्व बाद 248 : पीटर मलान 84 (288 चेंडूत 3 चौकार), एल्गार 34 (78 चेंडूत 2 चौकार), हामझा 18, महाराज 2, डु प्लेसिस 19 (57 चेंडूत 3 चौकार), व्हान डर डुसेन 17 (140 चेंडूत 2 चौकार), डी कॉक 50 (107 चेंडूत 7 चौकार), फिलँडर 8 (51 चेंडूत 2 चौकार), प्रिटोरियस 0, नॉर्ट 0, रबाडा नाबाद 3, अवांतर 13. गोलंदाजी : स्टोक्स 3-35, डेन्ली 2-42, अँडरसन 2-23, ब्रॉड व करन 1-37, बेस 1-57.