लंडन / ऑनलाईन टीम
ब्रिटीश राजघराण्यातले वयाने सर्वांत ज्येष्ठ सभासद आणि महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले आहे. लंडनमधील बकिंघम पॅलेसनं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. प्रिन्स फिलिप यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग असंही म्हटलं जायचं. प्रिंस फिलिप यांच्या निधनानं ब्रिटनमध्ये शोककळा पसरली आहे. ब्रिटनच्या ऐतिहासिक इमारतींवरील ध्वज त्यांच्या सन्मानार्थ खाली उतरवले आहेत. तसेच राष्ट्रीय शोक देखील जाहीर करण्यात आला आहे.
माहितीनुसार मागील १६ मार्च रोजीच त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला होता. प्रिन्स फिलिप यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना १६ फेब्रुवारीला लंडनच्या किंग एडवर्ड सप्तम हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. १६ मार्च रोजी त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाली होती. मात्र त्यांच्यावर हृदयरोगासंदर्भात उपचार सुरु होते. अशात आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
राणी एलिझाबेथ (द्वितीय) म्हणजे तत्कालीन राजकुमारी आणि प्रिन्स फिलीप यांचा १९४७ मध्ये विवाह झाला होता. ब्रिटीश राजघराण्यात ७० वर्षं ड्युकपदावर राहिलेले फिलीप हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते. सुरुवातीला ते ब्रिटीश रॉयल नेव्हीत कार्यरत होते. एका सम्राज्ञीबरोबर ७० वर्षांहून अधिक संसार केला आणि त्यासाठीच त्यांना ओळखले जाते.