वृत्तसंस्था/ पर्थ
ऑस्ट्रेलियात होणाऱया आगामी बिग बॅश लीग टी-20 हंगामासाठी पर्थ स्कॉचर्स संघाने इंग्लंडचे क्रिकेटपटू लॉरी इव्हान्स आणि ब्रेडॉन कॅरेसी यांच्याशी नवा करार केला आहे.
क्रिकेटच्या टी-20 प्रकारात इव्हान्स आणि कॅरेसी यांनी अधिक सामने खेळले आहेत. इव्हान्सने या प्रकारात 184 सामने खेळले आहेत. तो एक आक्रमक फलंदाज असून संघाला विजय मिळवून देण्यात त्याच्याकडे निश्चितच क्षमता आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बेडॉन कॅरेसी याची इंग्लंडमधील इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत चालू वर्षीच्या हंगामात दर्जेदार कामगिरी झाली आहे. या स्पर्धेत डय़ुरहॅम संघाचे प्रतिनिधीत्व करतो.
कॅरेसी हा भेदक गोलंदाज असून उपयुक्त फलंदाजही असल्याने बिग बॅश लिग टी-20 स्पर्धेत पर्थ स्कॉचर्स संघाला त्याचा अधिक लाभ मिळेल. गेल्या जुलैमध्ये 26 वर्षीय कॅरेसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले होते. पाकविरुद्ध वनडे मालिकेत त्याची कामगिरी समाधानकारक झाली आणि इंग्लंडने ही मालिका एकतर्फी जिंकली. वनडे क्रिकेटमध्ये कॅरेसीची 61 धावात 5 बळी ही सर्वोच्च कामगिरी आहे.
इंग्लंडचा संघ ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात सरावाचा सामना खेळविला जाणार आहे. कॅरेसी इंग्लंड लायन्स संघाकडून खेळणार आहे. या सामन्यानंतर तो बिग बॅश लीग स्पर्धेसाठी पर्थ स्कॉचर्स संघात दाखल होईल.