वृत्त संस्था/ दुबई
इंग्लंड संघातील अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोनला भारताविरूद्ध सरावाच्या सामन्यात खेळताना दुखापत झाली. या दुखापतीमुळे आयसीसीच्या होणाऱया आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याच्या सहभागाविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
सोमवारी झालेल्या सरावाच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 गडय़ांनी पराभव केला होता. या सामन्यातील शेवटच्या सत्रामध्ये लिव्हिंगस्टोनच्या डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाल्याने त्याला वेदना जाणवू लागल्या. सीमारेषेवर झेल घेण्याच्या प्रयत्नात लिव्हिंगस्टोनला ही दुखापत झाली. आगामी 24 तासांच्या कालावधीत लिव्हिंगस्टोनच्या या दुखापतीचे स्वरूप निश्चित होईल.
या सरावाच्या सामन्यात 28 वर्षीय लिव्हिंगस्टोनने फलंदाजी करताना 20 चेंडूत 30 धावा जमविल्या तर गोलंदाजीत त्याने दोन षटकांत 10 धावांच्या मोबदल्यात 1 गडी बाद केला. त्याने कर्णधार कोहलीला बाद केले. आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या इंग्लंड संघामध्ये अष्टपैलू स्टोक्सच्या जागी लिव्हिंगस्टोनचा समावेश करण्यात आला. मानसिक अस्वास्थामुळे स्टोक्सने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता इंग्लंड संघाचा दुसरा सरावाचा सामना बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा सलामीचा सामना विद्यमान विजेता विंडीजबरोबर येत्या शनिवारी होणार आहे.