वृत्तसंस्था/ लंडन
कोरोना महामारी संकटामुळे इंग्लंडमधील क्रिकेट संदर्भातील सर्व हालचाली गेल्या जवळपास अडीच महिन्यांच्या कालावधीत ठप्प झाल्या होत्या. आता पुढील महिन्यात विंडीजचा संघ इंग्लंडच्या दौऱयावर मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू करण्यापूर्वी इंग्लंडचे क्रिकेटपटू महत्त्वाची कामगिरी करणाऱया कोव्हिड योद्धय़ांची नावे असलेले शर्टस् सरावावेळी परिधान करून या कर्मचाऱयांचा वेगळय़ा स्वरूपात गौरव केला जाणार असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने झाल्याने हजारों बळी या महामारीने घेतले आहेत. कोरोनाशी लढत देण्यासाठी ब्रिटनमधील डॉक्टर्स, नर्सिस, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षक यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. आता स्थानिक क्रिकेट क्लबनी या कर्मचाऱयांची नावे मंडळाकडे पाठवावीत, असे सांगण्यात आले आहे. विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी आठ जुलैपासून साऊदम्पटन येथे सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटी ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर घेतली जाईल.