वृत्तससंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकाविरूद्ध येथे सुरू असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीतील खेळाच्या दुसऱया दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभा केला. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात बिनबाद 2 धावा जमविल्या होत्या. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या समयोजित फलंदाजीमुळे इंग्लंडला 400 धावांचा टप्पा गाठता आला. दक्षिण आफ्रिकेतर्फे नॉर्जेने 5 गडी बाद केले.
इंग्लंडने 4 बाद 192 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर नाबाद राहिलेल्या इंग्लंडच्या रूट आणि पॉप यांनी आपली अर्धशतके झळकविली. ओली पॉपने 78 चेंडूत 8 चौकारांसह 56 धावा जमविल्या. नॉर्जेने त्याचा त्रिफळा उडविला. रूट आणि पॉप यांनी पाचव्यागडय़ासाठी 101 धावांची भागिदारी केली. कर्णधा रूट 10 गडय़ाच्या रूपात तंबूत परतला. त्याने 108 चेंडूत 6 चौकारांसह 59 धावा जमविल्या. इंग्लंडचा फलंदाज क्यूरेन खाते उघडण्यापूर्वी तंबूत परतला. बटलर आणि वोक्स यांनी आठव्या गडय़ासाठी 40 धावांची भर घातली.
बटलरने 43 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर वोक्स नॉर्जेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 5 चौकारांसह 32 धावा जमविल्या. मार्क वूड आणि ब्रॉड या शेवटच्या जोडीने चिवट फलंदाजी करत 50 चेंडूत 82 धावांची भगिदारी केल्याने इंग्लंडला पहिल्या डावात 400 धावापर्यंत मजल मारता आली. ब्रॉडने 28 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 43 तर वूडने 39 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 35 धावा जमविल्या.
इंग्लंडच्या शेवटच्या तीन फलंदाजांनी 110 धावांची भर घातली. खेळाच्या पहिल्या दिवशी क्रार्लेने 11 चौकारांसह 66 तर सिबेलीने 7 चौकारांसह 44 धावा जमविल्या. या जोडीने सलामीच्या गडय़ासाठी 107 धावांची भगिदारी केली होती. डिनेलीने 4 चौकारांसह 27 धावांची योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेतर्फे नॉर्जेने 110 धावांत 5 तर फिलँडर आणि पॅटरसन यांनी प्रत्येकी 2 तसेच हेंड्रीग्जने 1 गडी बाद केला. चार सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने यजमान दक्षिण आफ्रिकेवर 2-1 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव- 98.2 षटकांत सर्वबाद 400 (क्रॉले 66, सिबेली 44, डिनेली 27, रूट 59, पॉप 56, बटलर 20, वोक्स 32, वूड नाबाद 35, ब्रॉड 43, नॉर्जे 5-110, फिलँडर 2-50, पॅटरसन 2-86, हेंड्रिग्ज 1-111).