दुसरी कसोटी तिसरा दिवस – बटलरचेही अर्धशतक, इंग्लंड अद्याप 42 धावांनी पिछाडीवर
वृत्तसंस्था/ गॅले
कर्णधार जो रूटने झळकवलेल्या 19 व्या कसोटी शतकाच्या आधारे इंग्लंडने लंकेविरुद्धच्या दुसऱया व शेवटच्या कसोटीच्या तिसऱया दिवशीअखेर 9 बाद 339 जमविल्या असून ते लंकेपेक्षा 42 धावांनी पिछाडीवर आहेत. रूटने सलग तिसऱया कसोटीत 150 हून अधिक धावा जमविण्याचा पराक्रम केला असून असा पराक्रम करणारा इंग्लंडचा तो गेल्या सोळा वर्षातील पहिला फलंदाज बनला आहे. याशिवाय जोस बटलरनेही अर्धशतक नोंदवले.
दिवसभर फलंदाजी करून थकलेला रूट दिवसातील शेवटच्या षटकावेळी धावचीत झाला. परेराचा चेंडू त्याने शॉर्टलेगकडे फटकावला आणि धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. पण ओशादा फर्नांडोने चेंडूवर ताबा घेत चेंडू यष्टीच्या दिशेने फेकला, त्यावेळी रूट क्रीझमध्ये वेळेत पोहोचू शकला नव्हता. त्याने 309 चेंडूंच्या खेळीत 18 चौकारांसह 186 धावा जमविल्या. रूटने याआधी पहिल्या कसोटीत 228 धावा जमवित मार्कस ट्रेस्कोथिकच्या (194, 151) दोन कसोटी शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. 2005 मध्ये बांगलादेशविरुद्ध ट्रेस्कोथिकने हा विक्रम केला होता. रूटने या खेळीत लंकन स्पिनर्सविरुद्ध स्वीपचा सढळ वापर केला होता. विशेष म्हणजे कोहलीप्रमाणे मागील वर्षी त्याला एकही कसोटी शतक नोंदवता आले नव्हते. कारकिर्दीत पहिल्यांदाच हा प्रकार घडला आहे. याशिवाय रूट हा इंग्लंडतर्फे सर्वाधिक धावा जमविणारा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. त्याने डेव्हिड गॉवर व केव्हिन पीटरसन यांना मागे टाकले आहे. त्याने 99 व्या कसोटीत 180 डावांत 8238 धावा जमविल्या आहेत. इंग्लंड अद्याप 42 धावांनी पिछाडीवर असून जॅक लीच व स्टुअर्ट ब्रॉड ही पिछाडी भरून काढतील, अशी अपेक्षा आहे. लंकेचा स्पिनर लसिथ एम्बुल्डेनियाने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना 132 धावांत 7 बळी मिळविले.
इंग्लंडने 2 बाद 98 या धावसंख्येवरून तिसऱया दिवसाचा खेळ पुढे सुरू केला होता. सलामीवीर सिबली व क्रॉली स्वस्तात बाद झाले होते. बेअरस्टोदेखील फार वेळ टिकला नाही. तो 28 धावांवर बाद झाला. पहिल्या कसोटीत डॅन लॉरेन्सने चांगले प्रदर्शन केले होते. पण यावेळी एम्बुल्डेनियाने त्याला 3 धावांवर बाद केले. यावेळी इंग्लंडची स्थिती 4 बाद 132 अशी झाली होती. पण रूट व बटलर यांनी ही पडझड रोखताना पाचव्या गडय़ासाठी 97 धावांची भागीदारी केली. रिव्हर्स स्वीप करताना बटलरचा शॉर्टलेगवर उडालेला झेल फर्नांडोने टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. त्याने 95 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 55 धावा काढल्या. पदार्पण करणारा स्पिनर रमेश मेंडिसचा हा पहिला कसोटी बळी होता. त्यानंतर दुसऱया सत्रातील शेवटच्या षटकात सॅम करन 13 धावा काढून बाद झाला. डॉम बेसने मात्र रूटला चांगली साथ दिली आणि त्यांनी सातव्या गडय़ासाठी 81 धावांची उपयुक्त भागीदारी केली. बेसने 4 चौकारांसह 32 धावा जमविल्या तर मार्क वूड एका धावेवर बाद झाला. दोघेही स्लिपमध्ये थिरिमनेकरवी झेलबाद झाले. थिरिमनेने स्लिपमध्ये एकूण पाच झेल टिपून डावात 5 झेल टिपणारा लंकेचा पहिला क्षेत्ररक्षक होण्याचा बहुमानही मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः लंका प.डाव 381, इंग्लंड प.डाव 114.2 षटकांत 9 बाद 339 ः क्रॉली 5, सिबली 0, बेअरस्टो 28 (5 चौकार), रूट 186 (309 चेंडूत 18 चौकार), लॉरेन्स 3, बटलर 55 (95 चेंडूत 7 चौकार), सॅम करन 13 (1 षटकार), डॉम बेस 32 (4 चौकार), वूड 1, लीच नाबाद 0, अवांतर 16. गोलंदाजी ः एम्बुल्डेनिया 7-132, रमेश मेंडिस 1-48, लकमल 0-31, असिथा फर्नांडो 0-31, दिलरुवान परेरा 0-86.
इंग्लंडतर्फे आठ हजारहून अधिक धावा जमविणारे फलंदाज
फलंदाज सा. डाव ना. धावा 100 50
ऍलेस्टर कूक 161 291 16 12472 33 57
ग्रॅहम गूच 118 215 6 8900 20 46
ऍलेक्स स्टीवर्ट 133 235 21 8463 15 45
जो रूट 99 180 14 8238 19 49
डेव्हिड गॉवर 117 204 18 8231 18 39
केविन पीटरसन 104 181 8181 8 23 35
जेफ्री बॉयकॉट 108 193 23 8114 22 42.