वृत्तसंस्था/ सेंट जॉर्ज (ग्रेनेडा)
तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील तिसऱया आणि शेवटच्या निर्णायक सामन्यात गुरुवारी खेळाच्या पहिल्या दिवशी यजमान विंडीजच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. त्यांचा पहिला डाव 204 धावात आटोपला.
या मालिकेतील पहिले दोन्ही सामने अनिर्णीत राहिले आहेत. या शेवटच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजच्या भेदक वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज कोलमडले. इंग्लंड संघातर्फे शेवटची जोडी लिच आणि मेहमूद यांनी 90 धावांची भागीदारी केल्याने इंग्लंडला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. लिचने 141 चेंडूत 5 चौकारांसह 41, शकीब मेहमूदने 118 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 49 धावा जमविल्या. त्याआधी सलामीच्या लीसने 5 चौकारांसह 31, वोक्सने 3 चौकारांसह 25, ओव्हरटनने 14 धावा जमविल्या. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक पार करता आले नाही. विंडीजतर्फे सिलेसने 40 धावात 3 तर रॉच, मेयर्स आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ब्लॅकवूडने 1 बळी मिळविला.
खेळाच्या दुसऱया सत्रात इंग्लंडने तीन षटकामध्ये 3 गडी गमावल्याने त्यांची स्थिती 5 बाद 37 अशी केविलवाणी झाली होती. लिच आणि सकीब मेहमूद यांनी पहिल्या दिवसाअखेर चिवट फलंदाजी करत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पहिल्या दिवसाच्या खेळातील दोन चेंडू बाकी असताना विंडीजच्या ब्लॅकवूडने सकीब मेहमूदचा त्रिफळा उडविला. या सामन्यात विंडीजची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड प. डाव 89.4 षटकात सर्वबाद 204 (लिच नाबाद 41, सकीब मेहमूद 49, लीस 31, वोक्स 25, ओव्हरटन 14, सिलेस 3-40, रॉच 2-41, मेयर्स 2-13, जोसेफ 2-33, ब्लॅकवूड 1-4).