लंडन
इंग्लंडमध्ये पुन्हा कोरोनाच्या लाटेने डोके वर काढले आहे. गेल्या 24 तासात ब्रिटनमध्ये 44 हजारहून अधिक जण कोरोना-19 पॉझिटीव्ह आढळून आले असल्याची माहिती आहे. सदरच्या रुग्णवाढीमुळे पुन्हा सरकारची चिंता वाढली असून आवश्यक उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे सांगितले जाते. सरकारी आकडेवारीनुसार 40 हजाराचा आकडा गेले तीन दिवस सातत्याने पार केला जात आहे, असेही दिसून आले आहे. सलग तिसऱया दिवशी रुग्णसंख्या वाढल्याने सरकार खडबडून जागे झाले आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 83 लाख 61 हजार 651 इतकी झाली असून 145 जणांचा नुकताच मृत्यु झाला आहे. एकूण 1 लाख 38 हजार 379 जणांनी कोरोनामुळे आपला प्राण गमावला आहे. दुसरीकडे इंग्लंडमध्ये 85 टक्के 12 वर्षावरील व्यक्तिंना पहिला लसीचा डोस देण्यात आला आहे तर 78 टक्के जणांना दोन्ही लसीचा डोस प्राप्त झाल्याचे समजते.