वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या विंडीजच्या दौऱयावर टी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील येथे शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान विंडीजने इंग्लंडचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव करत या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
या सामन्यात विंडीजच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडची फलंदाजी कोलमडली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 19.4 षटकांत 103 धावांत आटोपला. विंडीजचा माजी कर्णधार जेसन होल्डरने 7 धावांत 4 गडी बाद केले. होल्डरने इंग्लंडच्या शकीब मेहमूद आणि आदिल रशीद यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. इंग्लंडतर्फे ख्रिस जॉर्डनने 28 तर रशीदने 22 धावा जमविल्या. रशीद आणि जॉर्डन यांनी आठव्या गडय़ासाठी 36 धावांची भागिदारी केल्याने इंग्लंडला 100 धावांचा टप्पा ओलंडता आला. या मालिकेत इंग्लंडतर्फे बटलर आणि स्टोक्स उपलब्ध झालेले नाहीत. प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजने 17.1 षटकांत 1 बाद 104 धावा जमवित हा सामना 9 गडय़ांनी जिंकला. विंडीज संघातील ब्रँडन किंगने नाबाद 52 धावा झळकविल्या. विंडीजने हा सामना 17 चेंडू बाकी ठेवून जिंकला.
संक्षिप्त धावफलक- इंग्लंड 19.4 षटकांत सर्वबाद 103 (जॉर्डन 28, आदिल रशीद 22, होल्डर 4-7), विंडीज 17.1 षटकांत 1 बाद 104 (ब्रँडन किंग नाबाद 52).