संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
प्रतिनिधी /मडगाव
फसवणुकीचा आरोप असलेल्या मूळ पश्चिम बंगालातील शिबाजी दास या 45 वर्षीय संशयित आरापीचा अटकपूर्व अर्ज मडगावच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.
वास्को पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रानुसार या प्रकरणातील वरील संशयित आरोपीने वास्को परिसरातील नॉयेल आल्बकेर्क व इतरांकडे संपर्क साधला आणणि इंग्लंड देशात नोकरी देतो सांगून त्यांच्याकडून 2,65,000 रक्कम घेतली आणि त्यांना विदेशात नोकरी दिली नाही.
संशयित आरोपी नवेवाडे वास्को येथे राहात होता. पीडित लोकांनी त्याच्या घराकडे जाऊन चौकशी कली तेव्हा संशयिताच्या पत्नीने संशयित बाहेर गावी गेल्याचे उत्तर देऊन त्याची बोळवण केली.
या प्रकरणी संशयिताला चौकशीसाठी वास्को पोलिसानी बोलावणे पाठवले तेव्हा संशयित आरोपी पोलीस चौकीत हजर राहिला नाही. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश विन्सेंत डिसिल्वा यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मूळ पश्चिम बंगालातील शिबाजी दास याचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळून लावला.