वृत्तसंस्था/ लंडन
येत्या बुधवारपासून साऊदम्पटन येथे सुरू होणाऱया यजमान इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटीसाठी शनिवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने 13 जणांचा संघ घोषित केला. या संघामध्ये नवोदित फिरकी गोलंदाज डॉम्निक बेसचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, राखीव खेळाडूतील मोईन अलीला संघात स्थान मिळाले नाही.
या पहिल्या कसोटीसाठी नियमित कर्णधार जो रुट उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे अष्टपैलू बेन स्टोक्सकडे कर्णधाराची धुरा या सामन्यासाठी सोपविण्यात आली आहे. रुटची पत्नी आपल्या दुसऱया अपत्याला जन्म देणार असल्याने रुटने आपण पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाही, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाला यापूर्वीच कळविले आहे. उभय संघामध्ये तीन कसोटीची ही मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील दुसरी आणि तिसरी कसोटी मँचेस्टरमध्ये होईल.
गेल्या सप्टेंबरमध्ये मोईन अलीने आपण काही कालावधीसाठी कसोटी क्रिकेटपासून विश्रांती घेणार असल्याचे इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला कळविले होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने 2020 सालासाठी बऱयाच क्रिकेटपटूंशी मध्यवर्ती करार यापूर्वी केला होता. मात्र, मोईन अलीला वगळण्यात आले. तरीही त्याचा कसोटी मालिकेसाठी सराव शिबिरात समावेश करण्यात आला होता. या शिबिरासाठी 30 क्रिकेटपटूंची निवड केली होती. फिरकी गोलंदाज डॉम्निक बेसने गेल्या जानेवारीत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात 5 बळी मिळविले होते. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लिचला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची बाधा झालेला इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करेन हा या व्याधीतून पूर्णपणे बरा झाला. त्याने आपल्या सरावालाही प्रारंभ केला होता. मात्र, त्याला या पहिल्या कसोटीत स्थान मिळू शकले नाही.
इंग्लंड संघ- बेन स्टोक्स (कर्णधार), अँडरसन, आर्चर, डॉम्निक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, बर्न्स, बटलर, क्रॉले, डिनेली, पॉप, सिबेली, ओक्स, मार्क वूड. राखीव खेळाडू- ब्रेसी, करेन, फोकेस, लॉरेन्स, लिच, शकीब मेहमूद, ओव्हरटन, रॉबिनसन आणि स्टोन.