वृत्तसंस्था/ केपटाऊन
बहुतेक क्रिकेटपटू सामना सुरू होण्याआधी सराव करताना इतर व्यायामाबरोबर फुटबॉल खेळून वार्मअप करीत असतात. इंग्लंडचे खेळाडूही दुसरी कसोटी सुरू होण्याआधी सकाळी फुटबॉल खेळत होते. पण सलामीवीर रॉरी बर्न्स त्यात खेळताना जखमी झाला असून तो आता द.आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित पूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. याची गंभीर दखल घेत इंग्लंडने यापुढे सरावावेळी फुटबॉल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडतर्फे सर्वाधिक धावा जमविणारा रॉरी बर्न्सच्या डाव्या पायाच्या घोटय़ाला फुटबॉल खेळताना दुखापत झाली. तपासणीत त्याच्या सांध्यातील स्नायूला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना घडल्यानंतर इंग्लंडचे क्रिकेट संचालक ऍश्ले जाईल्स व प्रमुख प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी याची गंभीर दखल घेतली असून यापुढे टेनिंगवेळी फुटबॉल खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जाईल्स यांना आधीपासून सरावावेळी फुटबॉल खेळणे पसंत नव्हते. त्यांनी जेव्हा पदाची सूत्रे स्वीकारली होती, त्यावेळी त्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. पण वरिष्ठ खेळाडूंनी त्यांची समजूत घालून त्यांना बंदी घालण्यापासून रोखले होते.