दौऱयासाठी इंग्लंडकडे संघाचे प्रयाण, डब्ल्यूटीसी फायनलसह सहा कसोटी खेळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या ‘मॅरेथॉन’ दौऱयावर जाणार असून 2 जूनला प्रयाण करण्यापूर्वी मुंबईत त्यांना आठ दिवसासाठी ‘हार्ड क्वारंटाईन’मध्ये रहावे लागणार आहे. या दौऱयात भारतीय संघ सहा कसोटी खेळणार असून त्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचाही समावेश आहे. ही लढत न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघाला दहा दिवसांचे सॉफ्ट क्वारंटाईन (ट्रेन्sिंगची परवानगी) मिळावे, यासाठी बीसीसीआय इंग्लंड मंडळाची बोलणी करीत आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे एकूण साडेतीन महिने वास्तव्य असणार आहे. ‘भारतीय संघाला प्रयाण करण्यापूर्वी आठ दिवसांच्या हार्ड क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल. यावेळी त्यांना फक्त हॉटेल रूममध्येच रहावे लागणार आहे. या कालावधीतील दुसऱया, चौथ्या, सातव्या दिवशी त्यांची आरटी-पीसीआर चाचणी घेतली जाईल आणि त्यात ते निगेटिव्ह असणे जरूरीचे आहे. त्यानंतरच त्यांना विमानात बसता येईल,’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने सांगितले. ‘बायोबबल ते बायोबबल असा प्रवास होणार असल्याने तिथे पोहोचल्यावर दहा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये कपात होऊ शकते का, हे पहावे लागेल. मात्र सॉफ्ट क्वारंटाईनमध्ये असताना खेळाडूंना सराव करता येणार आहे. साऊदम्प्टनमधील हॉटेल हिल्टन येथे भारतीय संघाचे वास्तव्य राहणार असून हे हॉटेल एजेस बाऊलचाच एक भाग आहे,’ असेही या सूत्राने सांगितले. 10 दिवसांचे क्वारंटाईन असल्यास 13 जूनला खेळाडू तेथून निघतील तर न्यूझीलंडविरुद्धची अंतिम लढत 18 जूनपासून सुरू होणार आहे.
असेही सांगण्यात आले आहे की, दौरा दीर्घ लांबीचा असल्याने खेळाडूंना आपल्या कुटुंबियांना सोबत नेण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र दौऱयाच्या सुरुवातीपासूनच की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत झाल्यानंतर त्यांना सोबत नेण्याची परवानगी देणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही लढत व प्रमुख दौरा यामध्ये एक महिन्याहून अधिक काळाचे अंतर असणार आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
प्रसिद्ध कृष्णाचे लसीकरण लांबणार
इंग्लंड दौऱयावर रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडू व्हॅक्सीनचा पहिला डोस घेऊन सज्ज होतील, असा विश्वास बीसीसीआयला वाटतो. मात्र प्रसिद्ध कृष्णासाठी या दौऱयाआधी लसीकरण करून घेणे शक्य होणार नाही. कारण वरुण चक्रवर्तीशी त्याचा संपर्क आल्याने तोही पॉझिटिव्ह आढळला आहे. ‘चाचणी निगेटिव्ह येणे आणि लसीकरण करून घेणे यात ठरावीक अंतर असावे लागते. जरी 18 ते 20 मे या कालावधीत घेतलेल्या चाचणीत प्रसिद्ध कृष्णा निगेटिव्ह आला तरी लसीकरणाचा पहिला डोस घेण्यासाठी त्याला चार आठवडय़ाचा कालावधी सोडावा लागणार आहे,’ असे या सूत्राने पुढे सांगितले. सर्व खेळाडूंना जर कोव्हिशिल्ड व्हॅक्सीन मिळाली तर इंग्लंडमध्ये त्यांना दुसरा डोस घेणे सोयीचे होणार आहे. कारण कोव्हिशिल्ड व्हॅक्सीन ऑक्सफोर्डनेच निर्माण केली आहे.
सौरव गांगुली, जय शहा डब्ल्यूटीसी अंतिम लढतीस उपस्थित राहणार
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी साऊदम्प्टनमध्ये उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. ‘बीसीसीआय अध्यक्ष व सचिव दोघेही या अंतिम लढतीसाठी उपस्थित राहतील, असे म्हटले जात आहे,’ असे सूत्राने सांगितले. यावेळी ते ईसीबी मंडळाशी स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे उर्वरित 31 सामने इंग्लंडमध्ये आयोजित करण्याबाबत तसेच आयसीसीचे विविध धोरणात्मक निर्णय या संदर्भात चर्चा करण्याचीही शक्यता आहे.