वृत्तसंस्था/ वुर्सेस्टर
मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या दौऱयात आपला पहिला विजय नोंदविला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शनिवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा 4 गडय़ांनी पराभव करत या मालिकेतील ‘व्हाईटवॉश’ टाळला. इंग्लंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. शेवटच्या सामन्यात मिताली राजला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी प्रत्येकी 47 षटकांचा खेळ करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 47 षटकांत 219 धावांत आटोपला. त्यानंतर भारताने 46.3 षटकांत 6 बाद 220 धावा जमवित हा सामना जिंकला. कर्णधार मिताली राजने 6 चेंडूत शानदार नाबाद 75 धावांची खेळी केली. या मालिकेतील मिताली राजचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले.
इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या विनफिल्ड-हिलने 52 चेंडूत 5 चौकारांसह 36, कर्णधार नाईटने 71 चेंडूत 4 चौकारांसह 46, स्किव्हर 59 चेंडूत 5 चौकारांसह 49, जोन्सने 1 चौकारांसह 17, डंकलीने 35 चेंडूत 1 चौकारांसह 28, क्रॉसने 9 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. सलामीची ब्युमाँट खाते उघडण्यापूर्वीच पांडेच्या गोलंदाजीवर पायचीत झाली. विनफिल्ड आणि नाईट यांनी दुसऱया गडय़ासाठी 67 धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या डावात 1 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे दीप्ती शर्माने 47 धावांत 3 तर गोस्वामी. पांडे, पुनम यादव, राणा आणि हरमनप्रित कौर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्त्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावात शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी सलामीच्या गडय़ासाठी 46 धावांची भागिदारी केली. वर्माने 3 चौकारांसह 19 तर स्मृतीने 57 चेंडूत 8 चौकारांसह 49 धावा जमविल्या. रॉड्रिग्ज 4 धावांवर त्रिफळाचीत झाली. हरमनप्रित कौरने 38 चेंडूत 16, दीप्ती शर्माने 25 चेंडूत 1 चौकारांसह 18, स्नेह राणाने 22 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. कर्णधार मिताली राजने 86 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 75 धावा जमवित आपल्या संघाला 3 चेंडू बाकी ठेवून विजय मिळवून दिला. मिताली राज आणि राणा यांनी सहाव्या गडय़ासाठी 50 धावांची भागिदारी केली. भारताच्या डावात 23 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोनने 2 तर क्रॉस, ग्लेन, स्किव्हर आणि नाईट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आता उभय संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 9 जुलैपासून नॉर्दम्प्टन येथे प्रारंभ होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड 47 षटकांत सर्वबाद 219 (विनफिल्ड 36, नाईट 46, स्किव्हर 49, जोन्स 17, डंकली 28, क्रॉस नाबाद 16, दीप्ती शर्मा 3-47, गोस्वामी, पांडे, यादव, राणा, कौर प्रत्येकी एक बळी)
भारत 46.3 षटकांत 6 बाद 220 (मिताली राज नाबाद 75, वर्मा 19, मानधना 49, कौर 16, दीप्ती शर्मा 18, राणा 24, इक्लेस्टोन 2-36, क्रॉस, ग्लेन, स्किव्हर, नाईट प्रत्येकी एक बळी).