पुढील वर्षी जुलैमध्ये होणार मालिका
वृत्तसंस्था/ लंडन
पुढील वर्षी जुलैमध्ये भारतीय संघ इंग्लंडमध्ये सहा मर्यादित षटकांचे सामने खेळणार असल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने जाहीर केले. 2022 मधील क्रिकेट वेळापत्रकाची घोषणा करताना त्यांनी ही माहिती दिली.
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱयावर असून आतापर्यंत चार कसोटी सामने झाले आहेत. 10 सप्टेंबरपासून या मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना सुरू होणार आहे. इतर वेळी इंग्लंड दौऱयातील भारताचे सलग सामने खेळविले जातात. पण यावेळी कोरोना महामारीच्या कारणास्तव भारतीय दौरा दोन विभागात घेण्यात आला आहे. पुढील वर्षी जुलैमध्ये इंग्लंडचा पुरुष संघ सर्व मर्यादित षटकांचे सामने मायभूमीत खेळणार असून त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड दौऱयावर येणार आहे. ईसीबीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 1 जुलै रोजी ओल्ड ट्रफोर्डवर टी-20 सामन्याने भारताचा हा दौरा सुरू होईल. त्यानंतर ट्रेंट ब्रिज (3 जुलै), एजेस बाऊल (6 जुलै) येथे पुढील सामने होतील.
वनडे मालिकेत तीन सामने होणार असून पहिला सामना एजबॅस्टन (9 जुलै) येथे होईल. नंतरचे दोन सामने ओव्हल (12 जुलै) व लॉर्ड्स (14 जुलै) येथे खेळविण्यात येणार आहेत. यानंतर इंग्लंड संघ वर्ल्ड चॅम्पियन्स न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटींच्या मालिकेने उन्हाळी मोसमाला सुरुवात करणार आहे.