मॅक्सवेलचे पुनरागमन, तीन टी-20, तीन वनडे सामने होणार
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाने पुढील महिन्यात मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱयावर जाणे निश्चित केले असून अष्टपैलू मॅक्सवेलचे या संघात पुनरागमन झाले आहे. कोरोना महामारीमुळे सर्व क्रिकेट मंडळे अडचणीत आली असून इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाच्या आर्थिक स्थितीला या मालिकेमुळे थोडी नवसंजीवनी मिळणार आहे.
4 सप्टेंबरपासून ही मालिका सुरू होणार असून साऊदम्प्टनमध्ये तीन टी-20 सामने खेळविले जातील. त्यानंतर मँचेस्टरमध्ये तीन वनडे सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ रवाना होईल. आधीच्या नियोजनाप्रमाणे या मालिका जुलैमध्ये होणार होत्या. ‘खेळाडू, स्टाफ, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे पदाधिकारी यांच्या प्रयत्नांमुळेच ही मालिका होणे शक्य झाले आहे, याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या मालिकेमुळे ईसीबीमधील सर्व स्तरावरील क्रिकेटला आर्थिक साहय़ मिळणार आहे,’ असे ईसीबीचे प्रमुख कार्यकारी टॉम हॅरिसन म्हणाले. महामारीच्या आधी एकूण 18 आंतरराष्ट्रीय मालिका ईसीबीने निश्चित केल्या होत्या. त्या पूर्ण करण्यास या मालिकेची मदत होणार आहे.
या दौऱयासाठी ऑस्ट्रेलियाने 21 सदस्यीय संघाची घोषणा केली असून महामारीच्या ब्रेकनंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने गेल्या वर्षी ब्रेक घेतला होता. हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीतूनही तो आता पूर्ण बरा झाला असल्याने त्याला या संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड दौऱयासाठी जाहीर झालेला ऑस्ट्रेलिया संघ : ऍरोन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन ऍगर, ऍलेक्स कॅरे, पॅट कमिन्स, हॅझलवुड, लाबुशेन, नाथन लियॉन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिली मेरेडिथ, जोश फिलिप, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, स्टार्क, स्टॉईनिस, अँड्रय़ू टाय, मॅथ्यू वेड, वॉर्नर, ऍडम झाम्पा.