वृत्तसंस्था/ लाहोर
येत्या ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान पाकचा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये तीन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. पाकचा नवोदित क्रिकेटपटू हैदर अलीला या दौऱयासाठी पाक निवड समितीने संधी दिली आहे. त्याचप्रमाणे तब्बल चार वर्षानंतर वेगवान गोलंदाज सोहेल खानचे पाक संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंड दौऱयासाठी पीसीबीने 29 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
पाकच्या 19 वर्षाखालील वयोगटातील संघामध्ये हैदर अली हा सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून ओळखला जातो. गेल्या जूनमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका युवा संघाविरुद्ध हैदर अलीने 317 धावा जमविल्या होत्या. 2019-20 चा क्रिकेट हंगाम हैदर अलीला खूपच यशस्वी ठरला असल्याने पीसीबीने 2020-21 च्या क्रिकेट हंगामासाठी हैदर अलीशी मध्यवर्ती करार करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या एसीसी इर्मजिंग चषक क्रिकेट स्पर्धेत हैदर अली हा सर्वाधिक धावा जमविणारा पाचवा फलंदाज ठरला होता.
पाकच्या संघामध्ये वेगवान गोलंदाज सोहेल खानचे पुनरागमन झाले आहे. सोहेल खानने आपला शेवटचा कसोटी सामना 2016 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. पाकमध्ये झालेल्या 2019-20 च्या राष्ट्रीय हंगामात सोहेल खानने क्वेद ई आझम चषक क्रिकेट स्पर्धेत नऊ सामन्यातून 22 गडी बाद केले होते.
इंग्लंडचा दौरा पाकच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या दौऱयात दर्जेदार कामगिरी करण्यासाठी पाकसमोरे मोठे आव्हान राहील. पाक संघामध्ये या दौऱयासाठी हैदर अली प्रमाणेच कासिफ भट्टी या नव्या चेहऱयाला संधी देण्यात आली आहे.
पाक संघ- अबिद अली, फक्र झमान, इमाम उल हक, शान मसूद, अझहर अली (कर्णधार), बाबर आझम (कसोटी उपकप्तान, टी-20 कप्तान), असद शफीक, फवाद आलम, हैदर अली, इफ्तिकार अहमद, खुशदिल शहा, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, फहीम अश्रफ, हॅरिस रॉफ, इम्रान खान, मोहम्मद अब्बास, मोहम्मद हसनेन, नसीम शहा, शाहीन शहा आफ्रिदी, सोहेल खान, उस्मान शेनवारी, वहाब रियाज, इमाद वासीम, कासीफ भट्टी, शादाब खान आणि यासीर शहा. राखीव- बिलाल असीफ, इम्रान बट्ट, मुसा खान आणि मोहम्मद नवाज.