जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था
तिसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव स्वीकारल्यानंतर इंग्लंडचा संघ उद्यापासून (शुक्रवार दि. 24) खेळवल्या जाणाऱया चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यात मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. या मालिकेत सध्या इंग्लंड 2-1 फरकाने आघाडीवर आहे. या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार, उद्या दुपारी 12.30 वाजता प्रारंभ होईल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ घरच्या मैदानावर खेळताना देखील बराच झगडत असल्याचे पहिल्या दोन सामन्यात प्रकर्षाने दिसून आले. यजमान संघाने सेंच्युरियनवरील पहिली कसोटी 107 धावांनी जरुर जिंकली. पण, त्यानंतर केपटाऊन व पोर्ट एलिझाबेथ येथील दोन्ही सामन्यात इंग्लंडने एकतर्फी विजय संपादन करत दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादा स्पष्ट केल्या.
डॉम सिबली, ऑलिए पोप व डॉम बेस यांच्यासारख्या युवा खेळाडूंनी इंग्लिश संघातर्फे आपली चुणूक दाखवली असून येथील शेवटच्या लढतीतही इंग्लंडला त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. जलद गोलंदाज कॅगिसो रबाडा निलंबनामुळे खेळू शकणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे यजमान संघाच्या अडचणीत भरच पडली आहे. रबाडाच्या गैरहजेरीत ऍनरिच नोर्त्झे हाच वेगवान मारा करु शकतो. पण, त्याच्याकडे अनुभवाची जोड नाही. आपली शेवटची कसोटी खेळणारा व्हरनॉन फिलँडर कारकिर्दीची विजयी सांगता करण्यासाठी येथे प्रयत्नशील असेल.
संभाव्य संघ
दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), डीन एल्गार, पीटर मलान, झुबेर हमझा, तेम्बा बवूमा, रास्सी व्हान डेर डय़ुसेन, किगन पीटरसन, क्विन्टॉन डी कॉक, व्हरनॉन फिलँडर, डेव्हॉन प्रिटोरियस, अँदिले पेहलुकवायो, केशव महाराज, ऍनरिच नॉर्त्झे, डेन पॅटरसन, ब्यूरन हेन्ड्रिक्स.
इंग्लंड : जो रुट (कर्णधार), झॅक क्रॉली, डॉम सिबली, जो डेन्ली, बेन स्टोक्स, ऑलिए पोप, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करण, डॉम बेस किंवा जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वूड.
सामन्याची वेळ : दुपारी 12.30 पासून