नव्या हंगामाची सुरुवात, न्यूझीलंडसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी ‘मॅच प्रॅक्टिस’ची संधी
लंडन / वृत्तसंस्था
प्रतिष्ठेच्या लॉर्ड्स स्टेडियमवर यजमान इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध आजपासून पहिल्या कसोटी सामन्यात लढणार असून न्यूझीलंडसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी ही एक प्रकारे मॅच प्रॅक्टिस असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
अलीकडे, कसोटी क्रिकेट प्रकारात इंग्लंडची कामगिरी निराशाजनक ठरत आली आहे. मार्चमध्ये तर त्यांना भारताविरुद्ध नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. जोस बटलर, जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स, बेन स्टोक्स यांना संघात निवडले गेले नाही. जेम्स ब्रेसी, ऑलि रॉबिन्सन, क्रेग ओव्हर्टन यांना येथे संधी मिळणे अपेक्षित आहे. फलंदाजीत जो रुट, ऑलि पोप, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली तर गोलंदाजीत जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, मार्क वूड, ऑलि स्टोन, क्रेग ओव्हर्टन, ऑलि रॉबिन्सन हे त्यांचे महत्त्वाचे खेळाडू असणार आहेत.
दुसऱया बाजूने, न्यूझीलंडचा संघ मात्र या क्रिकेट प्रकारात मागील वर्षभरापासून उत्तम फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध इंग्लिश भूमीत लढणे, हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. कर्णधार केन विल्यम्सन स्वतः पुढाकाराने लढतो. त्याला येथे रॉस टेलर, टॉम लॅथम यांची प्राधान्याने साथ मिळू शकते. गोलंदाजीची धुरा टीम साऊदी, काईल जेमिसन व नील वॅग्नर यांच्याकडे असणार आहे. न्यूझीलंडने ट्रेंट बोल्टला या मालिकेतून विश्रांती दिली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
इंग्लंड : झॅक क्रॉली, डॉमिनिक सिबली, हसीब हमीद, रोरी बर्न्स, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), जो रुट (कर्णधार), ऑलि पोप, डॅनिएल लॉरेन्स, ऑलि रॉबिन्सन, क्रेग ओव्हर्टन, जेम्स अँडरसन, जॅक लीच, ऑलि स्टोन, मार्क वूड.
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनव्हे, टॉम लॅथम, केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॅटलिंग (यष्टीरक्षक), कॉलिन डे ग्रँडहोम, काईल जेमिसन, डग ब्रेसवेल, मॅट हेन्री, टीम साऊदी, नील वॅग्नर.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : दुपारी 3.30 पासून.
जेम्स अँडरसन अनिल कुंबळेचा विक्रम मोडण्याच्या उंबरठय़ावर
इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेचा 619 बळींचा विक्रम मोडण्याच्या उंबरठय़ावर आहे. अँडरसनच्या खात्यावर सध्या 614 बळी नोंद आहेत. कुंबळेचा विक्रम मोडल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत अँडरसन तिसऱया स्थानी झेपावू शकेल. या यादीत पहिल्या दोन स्थानी मुथय्या मुरलीधरन व शेन वॉर्न विराजमान आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च बळी घेणारे 5 गोलंदाज
गोलंदाज / संघ / सामने / बळी / सर्वोत्तम
मुथय्या मुरलीधरन / श्रीलंका / 133 / 800 / 9-51
शेन वॉर्न / ऑस्ट्रेलिया / 145 / 708 / 8-71
अनिल कुंबळे / भारत / 132 / 619 / 10-74
जेम्स अँडरसन / इंग्लंड / 160 / 614 / 7-42 ग्लेन मॅकग्रा / ऑस्ट्रेलिया / 124 / 563 / 8-24