आयसीसी स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखण्याचा न्यूझीलंडचा निर्धार
अबु धाबी / वृत्तसंस्था
जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मात्र सध्या काही खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या इंग्लंडसमोर आज (बुधवार दि. 10) आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारणारा न्यूझीलंडचा संघ उभा ठाकेल, त्यावेळी त्यांची भिस्त एक्स फॅक्टर खेळाडूंवरच असणार आहे. दिग्गज सलामीवीर जेसॉन रॉय दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असून त्याची इंग्लंडला उणीव जाणवू शकेल. यावर ते कसा मार्ग काढणार, यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडला प्रबळ दावेदारांपैकी एक मोजले जात होते. त्यांनी सुपर-12 फेरीत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ साकारण्यात कसरही सोडली नाही. मात्र, या फेरीतील शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पत्करावा लागलेला पराभव त्यांच्यासाठी डोळय़ात अंजन घालणारा ठरला. इंग्लंडचा संघ अभेद्य राहिलेला नाही, हे त्या निकालावरुन स्पष्ट झाले. या पराभवामुळे त्यांच्यावर असलेल्या दडपणाचा लाभ घेण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असणार आहे.
जेसॉनऐवजी जेम्स व्हिन्सीचा समावेश
जेसॉन रॉय पोटरीच्या दुखापतीमुळे उर्वरित विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जेसॉनऐवजी जेम्स व्हिन्सीचा इंग्लिश संघात समावेश केला गेला आहे. जेसॉन रॉय व जोस बटलर हे या स्पर्धेतील सर्वात विस्फोटक सलामीवीर म्हणून ओळखले गेले, यावरुनच त्यांची परिणामकारकता लक्षात येईल.
जेसॉन रॉय स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्याने आता बटलरसमवेत जॉनी बेअरस्टोला सलामीला बढती मिळण्याची शक्यता आहे. बटलरने यापूर्वी बुधवारच्या लढतीत सामना जिंकून देणारी खेळी साकारली होती. आज उपांत्य फेरीतही संघाला त्याच्याकडून याचीच पुनरावृत्ती अपेक्षित असेल.
सॅम बिलिंग्ज मधल्या फळीत खेळेल, हे जवळपास निश्चित असून बाद फेरीतील लढतीत खेळण्यापूर्वी सर्व फलंदाजांची उत्तम मॅच प्रॅक्टिस झाली आहे, ही इंग्लंडसाठी जमेची बाजू ठरु शकते. गोलंदाजीच्या आघाडीवर मात्र तिमल मिल्स कमरेच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने ही चिंतेची बाब ठरु शकते. मिल्सने यापूर्वी हाणामारीच्या षटकात अतिशय किफायतशीर मारा केला होता. त्यामुळे, त्याच्या गैरहजेरीचा प्रतिस्पर्धी फलंदाज लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील असतील.
मोईन अली व अदिल रशिद हे फिरकीपटू पॉवर प्ले व मधल्या षटकात ब्रेकथ्रू मिळवून देण्यासाठी निर्णायक योगदान देऊ शकतात. 2019 वर्ल्डकप फायनल याच दोन संघात झाली आणि त्यावेळी बाऊन्ड्री काऊंटबॅकच्या निकषावर इंग्लंडचा संघ विजेता ठरला होता.
त्या लढतीनंतर न्यूझीलंडने विशेषतः आयसीसी इव्हेंट्समध्ये लक्षवेधी सातत्य राखले असून तीच घोडदौड येथेही कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. यापूर्वी आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये जेतेपदासाठी दावेदार मानल्या जाणाऱया भारताचे आव्हान सहज संपुष्टात आणण्याचा पराक्रम या संघाने गाजवला.
भेदक गोलंदाजी ही न्यूझीलंडची सर्वात मजबूत बाजू आहे. त्यांनी भारतासारख्या अव्वल संघाला 110 धावांवर रोखून धरले. अगदी अफगाणला उत्तम फलंदाज हाताशी असूनही 125 धावांवर समाधान मानावे लागले होते. ट्रेंट बोल्ट व टीम साऊदी लाईन व लेंग्थच्या निकषावर अतिशय काटेकोर मारा करु शकतात. ही बाब देखील निर्णायक ठरु शकते.
वास्तविक, लॉकी फर्ग्युसनची गैरहजेरी त्यांच्या गेमप्लॅनला धक्का देऊ शकत होती. पण, ऍडम मिल्नेने फर्ग्युसनची जागा पुरेपूर भरुन काढली असून ईश सोधी व मिशेल सॅन्टनर या फिरकीपटूंनी देखील लक्षवेधी मारा केला आहे. न्यूझीलंडचे फलंदाज उत्तम बहरात राहिले असून सलामीवीर मार्टिन गप्टीलने सर्वाधिक धावांचे योगदान दिले आहे. त्याचा सहकारी डॅरेल मिशेल देखील उत्तम फॉर्ममध्ये आहे. अनुभवी कर्णधार केन विल्यम्सनला मागील लढतीत उत्तम सूर सापडला असून येथे महत्त्वाच्या लढतीत आणखी एकदा लक्षवेधी योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
इंग्लंड ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, अदिल रशिद, जेम्स व्हिन्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, टॉम करण, रीस टॉपली.
न्यूझीलंड ः केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड ऍसल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनव्हे, मार्टिन गप्टील, काईल जेमिसन, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलीप्स, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट, ईश सोधी, टीम साऊदी, ऍडम मिल्ने.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वाजता.
‘ते’ धक्कातंत्र राबवण्यासाठी ट्रेंट बोल्ट सज्ज!
इंग्लंडचा संघ सध्या अतिशय उत्तम बहरात असला तरी प्रारंभीच्या काही षटकात त्यांना दोन-एक धक्के देणे शक्य झाले तर ते बॅकफूटवर फेकले जाऊ शकतात आणि हाच धागा पकडत न्यूझीलंडचा डावखुरा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्या स्पेलमध्ये खळबळ उडवून देण्याचा आपला प्रयत्न असेल, असे जाहीर केले.
इंग्लंडचा संघ या विश्वचषकात उत्तम बहरात राहिला असून सुपर-12 फेरीत त्यांनी सलग 4 विजय संपादन केले. या फेरीतील शेवटच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना पहिला धक्का बसला. न्यूझीलंडचा संघ आजच्या लढतीसाठी अंडरडॉग्ज म्हणून ओळखला जातो आहे.
‘इंग्लिश संघात अनेक मॅचविनर्स आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ते उत्तम खेळ साकारत आले आहेत. मात्र, बाद फेरीत प्रत्येक संघाला दक्ष रहावे लागते’, असे बोल्टने यावेळी नमूद केले. लॉकी फर्ग्युसन उपलब्ध नसल्याने आमची निराशा झाली होती. पण, सुदैवाने ऍडमने त्याची अजिबात उणीव जाणवू दिली नाही, असे हा दिग्गज डावखुरा गोलंदाज शेवटी म्हणाला.
चाहत्यांनी फुलून जाणार दुबईतील फायनल!
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलसाठी 100 टक्के उपस्थितीची परवानगी संमत केली गेली असून यामुळे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम चाहत्यांनी फुलून जाऊ शकते. या स्पर्धेतील फायनल रविवार दि. 14 रोजी खेळवली जाणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व ईसीबीने संयुक्त अरब अमिरातीतील प्रशासनाची चर्चा करत 100 टक्के प्रवेशासाठी परवानगी मागितली आणि ती संमत करण्यात आली. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमची 25 हजार इतकी प्रेक्षकक्षमता आहे.
दोन्ही संघांचा सुपर-12 फेरीतील प्रवास
इंग्लंड / – / न्यूझीलंड
विंडीजविरुद्ध 6 गडी राखून विजय / पहिली लढत / पाकविरुद्ध 5 गडय़ांनी पराभव
बांगलादेशविरुद्ध 8 गडी राखून विजय / दुसरी लढत / भारताविरुद्ध 8 गडी राखून विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 गडी राखून विजय / तिसरी लढत / स्कॉटलंडविरुद्ध 16 धावांनी विजय
श्रीलंकेविरुद्ध 26 धावांनी विजय / चौथी लढत / नामिबियाविरुद्ध 52 धावांनी विजय
द. आफ्रिकेविरुद्ध 10 धावांनी पराभव / पाचवी लढत / अफगाणविरुद्ध 8 गडी राखून विजय