वृत्तसंस्था/ बॅसेटेरी
आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड आणि पाकिस्तान यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवित उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अन्य एका सामन्यात विद्यमान विजेत्या बांगलादेशने कॅनडावर शानदार विजय नोंदविला.
इंग्लंड आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील सामन्यात इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्टने शानदार 154 धावांची खेळी करत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकात 6 बाद 362 धावा जमविल्या. कर्णधार प्रेस्टने 119 चेंडूत 4 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 154 धावांची खेळी केली. इंग्लंडच्या डावामध्ये जेकॉब बेथेलने 62, विलियम लक्सटोनने 47 आणि जॉर्ज थॉमसने 41 धावा जमविल्या. संयुक्त अरब अमिरात संघातील गोलंदाज या सामन्यात पूर्ण निस्तेज ठरले. प्रत्युत्तरादाखल खेळताना संयुक्त अरब अमिरातचा डाव 38.2 षटकात 173 धावात आटोपला. इंग्लंडतर्फे रेहान अहमदने 30 धावात 4 गडी बाद केले. अमिरात संघाची स्थिती 15 षटकात 5 बाद 61 अशी केविलवाणी झाली होती. अली नासीरने 44 चेंडूत 54 धावा जमविताना केशवानीसमवेत 6 व्या गडय़ासाठी 59 धावांची भागीदारी केली. केशवानी बाद झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातचे शेवटचे 4 गडी 53 धावात तंबूत परतले. इंग्लंडने हा सामना 189 धावांनी जिंकून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
गुरुवारी झालेल्या क गटातील सामन्यात पाकिस्तानने अफगाणवर 24 धावांनी विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या सामन्यात अफगाणने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 50 षटकात 9 बाद 239 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणचा डाव 215 धावात आटोपला. अफगाण संघातील बिलाल सायेदीने 81 चेंडूत 42 तर खेरोटेने 12 आणि नूरने 28 धावा जमविल्या. अफगाणचे पहिले शतक 170 चेंडूत नोंदविले गेले. तत्पूर्वी पाकच्या डावामध्ये अब्दुल फसीहने 68 धावा झळकविल्या. त्याने 95 चेंडूत 6 चौकार ठोकले. सलामीच्या मोहम्मद शेहजादने 43 तर कर्णधार कासीम अक्रमने 38 व एम. सदाकतने नाबाद 42 धावा झळकविल्या. अफगाणतर्फे नावेदने 41 धावात 3 तर नूर अहमदने 46 धावात 2 व नावेद झदनने 55 धावात 2 गडी बाद केले.
अ गटातील गुरुवारी झालेल्या सामन्यात विद्यमान विजेत्या बांगलादेशने कॅनडाचा 8 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. बांगलादेश संघातील फिरकी गोलंदाज एस. एम. मेहरोब आणि आर. मोंडल यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. या सामन्यात बांगलादेशने कॅनडाला 136 धावात रोखले. त्यानंतर बांगलादेशने 30.1 षटकात 2 गडय़ांच्या मोबदल्यात 137 धावा जमवित हा सामना 8 गडय़ांनी जिंकला. बांगलादेश संघाचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. बांगलादेशच्या इफ्तिकार हुसेनने 89 चेंडूत 61, नबिलने 33 आणि मोलाने नाबाद 20 धावा जमविल्या.