वृत्तसंस्था/ कराची
पुढील वर्षीच्या प्रारंभी इंग्लंड संघ टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान दौऱयावर जाणार आहे. पण ही मालिका आता ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात येणार आहे. अव्वल खेळाडूंची अनुपलब्धता आणि खर्चाबाबतची समस्या यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ही मालिका नियोजित करण्यात आली होती. पण आता ती भारतात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेआधीपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पुढील वर्षीच्या प्रारंभी इंग्लंड संघ लंका व भारताविरुद्धच्या मालिकांत गुंतणार आहे. याशिवाय त्यांचे काही टी-20 स्पेशालिस्ट खेळाडू ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळणार असून हीच मुख्य अडचण बनली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे,’ असे या घडामोडीवर लक्ष असलेल्या सूत्राने सांगितले. या दौऱयासाठी येणारा खर्च हे या निर्णयामागील दुसरे कारण आहे, असेही त्याने सांगितले.
‘या मालिकेत केवळ 3 टी-20 सामने होणार असून सर्व सामने कराचीतच खेळविले जाणार आहेत. इंग्लंड संघाचे सराव शिबिर दुबईमध्ये घेतले जाणार असून तेथून चार्टर्ड विमानाने ते कराचीला प्रयाण करणार आहेत. हा खर्च इंग्लंड मंडळाला परवडणारा नाही. दोन्ही देशांच्या मंडळांनी या संदर्भात चर्चा केली असून मालिका लांबणीवर टाकणे, हाच योग्य पर्याय असल्याचे वाटल्याने ऑक्टोबरपर्यंत ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याशिवाय त्यावेळी इंग्लंडचा पूर्ण ताकदीचा संघही पाकला पाठविता येणार आहे. तेथून हा संघ भारतात विश्वचषक स्पर्धेसाठी प्रयाण करेल,’ असेही या सूत्राने सांगितले. 2005 नंतर इंग्लंडने सुरक्षिततेच्या कारणास्तव पाकचा एकही दौरा केलेला नाही. जेव्हा दोन्ही मंडळांनी छोटा आयोजित करण्याचा विचार सुरू केला तेव्हा पाकमधील क्रिकेटला नवी संजीवनी मिळाली होती. पुढील वर्षीच्या प्रारंभी दक्षिण आफ्रिका संघही पाक दौऱयावर येणार असून यात दोन कसोटी व 3 टी-20 सामने खेळविले जाणार आहेत.