मालिकेतील पहिला सामना गमविण्याची परंपरा खंडित करण्याचे यजमानांसमोर आव्हान
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी बुधवारपासून येथे सुरू होत आहे. यजमान इंग्लंडला गेल्या दशकभरात मायभूमीत पाकवर मालिकाविजय मिळविता आलेला नाही. ही परंपरा खंडित करण्याची यावेळी ते निश्चितच प्रयत्न करतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 पासून सामन्याला सुरुवात होईल.
इंग्लंडने विंडीजविरुद्ध नुकतीच झालेली कसोटी मालिका जिंकली असल्याने त्यांचे मनोबल उंचावलेले आहे. पण पाकविरुद्ध त्यांना असे शेवटचे यश 2010 मध्ये मिळाले होते. मात्र त्यावेळची मालिका गाजली ती लॉर्ड्सवरील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे. या प्रकरणात काहीवर बंदी घालण्यात आली तर काहींना तुरुंगवासातही जावे लागले होते, त्यात पाकचा त्यावेळचा कर्णधार सलमान बट, वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ व मोहम्मद आमिर यांचा समावेश होता.
गेल्या दहापैकी आठ मालिकांत इंग्लंडने पहिली कसोटी नेहमीच गमविलेली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मालिकेतही त्यांना विंडीजकडून पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र नंतर इंग्लंडने ती मालिका 2-1 अशी जिंकली होती. कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊननंतर खेळविण्यात आलेली ती पहिलीच मालिका होती. पहिला सामना गमविण्याच्या या परंपरेची इंग्लंडला चांगली जाणीव आहे. ‘याबद्दल मी काहीच बोलणार नाही आणि माझ्याप्रमाणे संघव्यवस्थापन व संघदेखील याबाबत काही बोलणार नाहीत,’ असे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स म्हणाला. पहिला सामना गमविणे हा निश्चितच योगायोग आहे, मात्र त्यात बदल करण्याची आमची मनापासून इच्छा असून तसे प्रयत्नही आम्ही करणार आहोत, असेही तो म्हणाला.
इंग्लंडबाहेर सध्या कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा सामने नसल्याने ओल्ड ट्रफोर्डवरील या लढतीकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष केंद्रित झालेले असेल. इंग्लंडमधील पाकिस्तानच्या मागील दोन्ही मालिका (2016, 2018) अनिर्णीत राहिल्या होत्या. त्यामुळे पाक संघात उत्साहाचे वातावरण असू शकते. मात्र या सामन्याआधी त्यांना फक्त दोन सराव सामने खेळायला मिळाले आहेत, तेही आपापसातील संघांत. त्यामुळे मॅचप्रॅक्टिसच्या अभावामुळे त्यांना अडचणी येऊ शकतात. याउलट इंग्लंडला मालिका खेळावयास मिळाली असल्याने त्यांना प्रत्यक्ष मॅचप्रॅक्टिसचा चांगला अनुभव मिळाला आहे.
‘आम्ही चांगली तयारी केली असून संघातील खेळाडूंत चांगले बाँडिंगही तयार झाले आहे. पण दीर्घ काळानंतर कसोटी खेळण्याची संधी मिळाल्यावर मनावर थोडेसे दडपण येणे साहजिक आहे. आपले खेळाडू अँडरसन-ब्रॉड या अनुभवी वेगवान दुकलीशी कसा मुकाबला करतात, यावर मालिकेचा निकाल अवलंबून असेल,’ असे पाक संघाचा प्रशिक्षक मिसबाह उल हकने मान्य केले. अँडरसन-ब्रॉड दोघांनीही पाचशे बळींचा टप्पा गाठलेला असून ब्रॉडने अलीकडेच विंडीजविरुद्ध हा टप्पा गाठला. मात्र नवोदित वेगवान गोलंदाज नसीम शहा, डावखुरा शाहीन शहा आफ्रिदी, अचूक मारा करणारा मोहम्मद अब्बास या आश्वासक जलद गोलंदाजांमुळे मिसबाहचा विश्वासही दुणावला आहे. नसीमने गेल्या फेब्रुवारीत बांगलादेशविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवत सर्वात तरुण कसोटी हॅट्ट्रिकवीर होण्याचा मान मिळविला आहे. ओल्ड ट्रफोर्डवर पाक संघ दुहेरी फिरकीचा वापर करण्याची शक्यता आहे.
मिसबाहचा अबिद अली, शान मसूद, अझहर अली, बाबर आझम, आसद शफीक या फलंदाजांवर भरवसा असून त्यांच्याकडून मोठय़ा धावांचे अपेक्षा त्याने केली आहे. इंग्लंड चार जलद गोलंदाज खेळविण्याचा निर्णय या सामन्यातही कायम ठेवते का, हे पहावे लागेल. अष्टपैलू बेन स्टोक्सने सोमवारी नेटमध्ये पूर्ण क्षमतेने गोलंदाजी केल्याचे दिसून आले होते.