वृत्तसंस्था /टाँटन
यजमान इंग्लंडच्या महिला संघाने भारताविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. बुधवारी येथे झालेल्या या मालिकेतील दुसऱया सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 गडय़ांनी पराभव केला. कर्णधार मिताली राजने झळकवलेले या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक वाया गेले. इंग्लंडतर्फे डंकलीने शानदार शतक झळकविले. पाच गडी बाद करणारी इंग्लंडच्या केट क्रॉसला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताचा डाव 50 षटकांत 221 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने 47.3 षटकांत 5 बाद 225 धावा जमवित सामना आणि मालिका विजयावर शिक्कामोर्तब केला.
भारताच्या डावात सलामीच्या स्मृती मानधनाने 30 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावा जमविताना शफाली वर्मासमवेत पहिल्या गडय़ासाठी 56 धावांची भागिदारी केली. शफाली वर्माने 55 चेंडूत 7 चौकारांसह 44 धावा जमविल्या. जेमिमा रॉड्रिग्ज दोन चौकारांसह 8 धावांवर बाद झाली. कर्णधार मिताली राज आणि हरमनप्रित कौर यांनी चौथ्या गडय़ासाठी 68 धावांची भागिदारी केली. कौरने 1 चौकारांसह 19 धावा जमविल्या. दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा तसेच तानिया भाटिया आणि शिखा पांडे या चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. मिताली राजने 92 चेंडूत 7 चौकारांसह 59 धावा जमविल्या. झुलन गोस्वामीने 1 चौकारांसह नाबाद 19 तसेच पुनम यादवने 1 चौकारांसह 10 धावा जमविल्या. भारताच्या डावात 26 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे केट क्रॉसने 34 धावांत 5, इक्लेस्टोनने 33 धावांत 3 आणि स्किव्हरने 27 धावांत 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावात सलामीचा विनफिल्ड हिलने 57 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 42, ब्युमाँटने 1 चौकारांसह 10, कर्णधार नाईटने 1 चौकारांसह 10, स्किव्हरने 29 चेंडूत 19, जोन्सने 34 चेंडूत 3 चौकारांसह 28, डंकलीने 81 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 73 तर ब्रंटने 46 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 33 धावा जमविल्या. डंकली आणि ब्रंट यांनी सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 92 धावांची भागिदारी करून 15 चेंडू बाकी असताना विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. इंग्लंडच्या डावात 2 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे पुनम यादवने 2 तर गोस्वामी, शिखा पांडे आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत सर्वबाद 221 (मानधना 22, शफाली वर्मा 44, रॉड्रिग्ज 8, मिताली राज 59, हरमनप्रित कौर 19, दीप्ती शर्मा 5, स्नेह राणा 5, तानिया भाटिया 2, शिखा पांडे 2, झुलन गोस्वामी नाबाद 19, पुनम यादव 10, केट क्रॉस 5-34, इक्लेस्टोन 3-33, स्किव्हर 1-27).
इंग्लंड 47.3 षटकांत 5 बाद 225 (विनफिल्ड हिल 42, ब्युमाँट 10, नाईट 10, स्किव्हर 19, जोन्स 28, डंकली नाबाद 73, ब्रंट नाबाद 33, पुनम यादव 2-63, गोस्वामी 1-39, शिखा पांडे 1-34, राणा 1-43).