वृत्तसंस्था/ लंडन
युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात स्कॉटलंडने यजमान इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले. इंग्लंडच्या हॅरी केनला शेवटपर्यंत सूर मिळविण्यासाठी झगडावे लागले तर स्कॉटलंडच्या बचावफळीची कामगिरी दर्जेदार झाल्याने इंग्लंडला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.
वेम्बले स्टेडियमवर हॅरी केनकडे चेंडू क्वचितच असल्याचे आढळून आले. स्कॉटलंडच्या फुटबॉलपटूंनी इंग्लंडच्या हुकमी फुटबॉलपटूवर शेवटपर्यंत लक्ष ठेवत त्यांना गोल करण्यापासून दूर राखण्यास यश मिळविले. सामना सुरू झाल्यानंतर 11 व्या मिनिटाला इंग्लंडच्या बचावफळीतील जॉन स्टोन्सने हेडरद्वारे मारलेला फटका गोल पोस्टच्या बाहेरून गेला तर मॅसन माँऊटने मारलेला फटका स्कॉटलंडच्या गोलरक्षकाने ठोठविला.
63 व्या मिनिटाला स्कॉटलंडने गोल करण्याची संधी गमावली. त्यांच्या डिकेसने इंग्लंडच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण इंग्लंडच्या बचावफळीतील जेम्सने स्कॉटलंडच्या डिकेसला थोपविले. या स्पर्धेत स्कॉटलंड संघाला सलामीच्या सामन्यात झेक प्रजासत्ताकविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंड संघाने या स्पर्धेतील ड गटातील गेल्या मंगळवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात क्रोएशियाचा 1-0 असा पराभव करून दोन सामन्यातून 4 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. स्कॉटलंड आणि क्रोएशिया यांनी या गटातून प्रत्येकी एक गुण मिळविला आहे. शुकवारच्या सामन्यानंतर इंग्लंड संघाचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी स्कॉटलंडच्या बचावफळीच्या कामगिरीचे कौतुक केले.