पुढील महिन्यात विंडीजविरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका,
लंडन / वृत्तसंस्था
विंडीजविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सर ऍन्ड्रय़ू स्ट्रॉस, अंतरिम प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड व हेड स्काऊट जेम्स टेलर यांच्या निवड समितीने इंग्लंडचा 16 सदस्यीय संघ जाहीर करताना स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसनसारख्या दिग्गज खेळाडूंना डच्चू दिला. शिवाय, डरहॅमचा सलामीवीर ऍलेक्स लीस व यॉर्कशायरचा सीमर मॅथ्यू फिशर यांना पदार्पणाची संधी दिली. ही मालिका पुढील महिन्यात खेळवली जाणार असून त्यापूर्वी चार दिवसीय सराव सामन्याचे आयोजन केले गेले आहे. इंग्लंडचा संघ या मालिकेसाठी दि. 24 फेब्रुवारी रोजी रवाना होईल.
28 वर्षीय लीसने ऑस्ट्रेलियन प्रथमश्रेणी संघ लायन्सचे नेतृत्व भूषवले असून एलव्ही इन्शुरन्स कौंटी चॅम्पियनशिपमध्ये डरहॅम व त्यापूर्वी यॉर्कशायर संघातर्फे उत्तम खेळ साकारला आहे. गतवर्षी चॅम्पियनशिप हंगामात त्याने 625 धावांची आतषबाजी केली. त्यामध्ये 129 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.
24 वर्षीय फिशरने मागील हंगामात यॉर्कशायरतर्फे 19.65 च्या सरासरीने 20 बळी घेतले असून लायन्स संघातर्फेही तो स्टँड-आऊट परफॉर्मर ठरला होता. सकिब महमूद व मॅथ्यू पार्किन्सन यांना कॅरेबियन भूमीत कसोटी पदार्पणाची अपेक्षा असून सरेचा यष्टीरक्षक बेन फोक्स हा भारताविरुद्ध अहमदाबाद कसोटीनंतर प्रथमच संघात परतला आहे. जेम्स अँडरसन, डॉम बेस, सॅम बिलिंग्ज, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, हसीब हमीद व डेव्हिड मलान या ऍशेस मालिकेत खेळलेल्या 8 खेळाडूंना विंडीजविरुद्ध मालिकेतून वगळले गेले आहे.
विंडीज कसोटी मालिकेसाठी इंग्लिश संघ ः जो रुट (कर्णधार), डॅन लॉरेन्स, झॅक क्रॉली, ऑलि पोप, सकिब महमूद, ऍलेक्स लीस, बेन फोक्स (यष्टीरक्षक), मार्क वूड, ख्रिस वूक्स, मॅथ्यू पार्किन्सन, जॉनी बेअरस्टो, ऑलि रॉबिन्सन, मॅथ्यू फिशर, क्रेग ओव्हर्टन, जॅक लीच, बेन स्टोक्स.
इंग्लंड-विंडीज मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / ठिकाण
8 ते 12 मार्च / पहिली कसोटी / नॉर्थ साऊंड
16 ते 20 मार्च / दुसरी कसोटी / ब्रिजटाऊन
24 ते 28 मार्च / तिसरी कसोटी / सेंट जॉर्ज
कोट्स
ऍशेस मालिकेतील नामुष्कीजनक पराभवानंतर संघात व्यापक फेरबदल करण्याची नितांत गरज होती आणि त्यानुसार आम्ही संघाची फेररचना केली आहे. जुन्या चेहऱयांना वगळता तरुण रक्ताला प्राधान्य देण्याची आमची रणनीती आहे. मात्र, याचा अर्थ ब्रॉड, अँडरसन यांची कारकीर्द संपली, असा घेऊ नये.
-ईसीबीचे अंतरिम व्यवस्थापकीय संचालक सर ऍन्ड्रय़ू स्ट्रॉस