वृत्तसंस्था/ लंडन
कोरोना महामारीमुळे ब्रिटनमध्ये स्थगित करण्यात आलेल्या इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेला जून महिन्यात सुरू करण्याचे संकेत मिळत आहे. ब्रिटीश शासनाकडून या स्पर्धेसाठी हिरवा कंदील दाखविला जाईल पण फुटबॉलपटू, प्रशिक्षक वर्ग यांच्या आरोग्याच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य दिले जाईल. फुटबॉलपटूंची तसेच फुटबॉल प्रशिक्षक आणि इतर प्रशिक्षक वर्गाला आपले आरोग्य सुखरूप राहील याचा विश्वास असेल तरच ही स्पर्धा जूनमध्ये सुरू होईल, अशी चर्चा सुरू आहे.
ब्रिटनमधील फुटबॉल हंगामाला जूनमध्ये प्रारंभ करण्यासाठी शासनाकडून परवानगी दिली जाण्याचे संकेत मिळाले आहे. अलीकडेच ब्रिटीश फुटबॉल फेडरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱयांबरोबर ब्रिटीश शासनाच्या अधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीत इंग्लिश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या हंगामाला जूनमध्ये सुरू करण्याबाबत प्रतिसाद मिळाला. जून महिन्यात ब्रिटनमधील फुटबॉल हंगाम सुरू करण्यासाठी शासनाने आपले दरवाजे खुले ठेवले आहेत.
शासनाकडून परवानगी मिळाली तरी कोरोना परिस्थितीचा आढावा घेवून फुटबॉलपटू, प्रशिक्षक वर्ग यांना आरोग्याविषयी कोणता धोका नसल्याचे आढळून आल्यानंतर फुटबॉल हंगाम सुरू होईल. फुटबॉलपेक्षा खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेला आम्ही अधिक प्राधान्य देत असल्याचे राज्य शासनाचे सांस्कृती, क्रीडा आणि प्रसार माध्यमाचे सचिव ऑलिव्हर डोव्हेडेन यांनी सांगितले. ब्रिटनमधील फुटबॉल हंगाम सुरू करण्यासाठी शासनातर्फे वैद्यकीय तज्ञांची मते आजमावली जात आहेत.