न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर
लंडन / वृत्तसंस्था
न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात होणाऱया 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड व वेल्स क्रिकेट व्यवस्थापन मंडळाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात जलद गोलंदाज ऑलि रॉबिन्सन व फलंदाज जेम्स ब्रेसी या दोन नव्या चेहऱयांचा समावेश केला आहे. उभय संघातील ही मालिका 2 जूनपासून इंग्लिश भूमीवर खेळवली जाणार आहे. आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या इंग्लिश खेळाडूंनी 10 दिवसांचे क्वारन्टाईन पूर्ण केले असले तरी त्यांना सध्या विश्रांती देण्याचा निर्णय येथे ईसीबीने घेतला.
येत्या हंगामात इंग्लिश संघ मायभूमीत 7 कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे, प्रत्येक खेळाडूवरील वर्कलोड लक्षात घेत आम्ही नव्या खेळाडूंना संधी दिली आहे, असे ईसीबीचे संचालक ऍश्ले जाईल्स यांनी नमूद केले. ग्लोसेस्टरशायरचा यष्टीरक्षक-फलंदाज जेम्स ब्रेसी व ससेक्सचा सीमर ऑलि रॉबिन्सन यांना कसोटी संघात प्रथमच स्थान मिळाले आहे. ब्रेसीने कौंटी चॅम्पियनशिपमध्ये 478 धावांचे योगदान दिले असून रॉबिन्सनने 14 च्या सरासरीने 29 बळी घेतले आहेत.
जो रूटकडे या संघाचे नेतृत्व असणार आहे. सॉमरसेटचा अष्टपैलू क्रेग ओव्हर्टन या निमित्ताने संघात पुन्हा परतला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेत त्याने इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले होते.
इंग्लिश पुरुष संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनी या हंगामात न्यूझीलंड व भारत या जागतिक स्तरावरील दोन अव्वल संघाविरुद्ध लढण्याचा आनंद वेगळा असेल, असे यावेळी म्हटले. या दोन मालिकांमुळे आमची ऍशेससाठी उत्तम तयारी होईल, याचा त्यांनी येथे उल्लेख केला.
‘न्यूझीलंडविरुद्ध या मालिकेत काही खेळाडू दुखापत किंवा विश्रांती यामुळे उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे, नवोदित खेळाडूंना लक्षवेधी पदार्पण नोंदवण्यासाठी ही उत्तम संधी असणार आहे. जेम्स ब्रेसी व ऑलि रॉबिन्सन यांच्यात उत्तम गुणवत्ता आहे आणि त्यांनी कौंटी हंगामात सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. मागील 18 महिने ते उत्तम खेळत आले आहेत’, असे जाईल्स यांनी तपशीलवार बोलताना सांगितले.
न्यूझीलंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ ः जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, झॅक क्राऊली, डॉम सिबली, डॅन लॉरेन्स, ओलि पोप, जेम्स ब्रेसी, बेन फोक्स, क्रेग ओव्हर्टन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, मार्क वूड, जॅक लीच, ओलि स्टोन, ओलि रॉबिन्सन.
इंग्लंड-न्यूझीलंड मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / ठिकाण
2 ते 6 जून / पहिली कसोटी / लंडन
10 ते 14 जून / दुसरी कसोटी / बर्मिंगहम
आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंना विश्रांती
अलीकडेच स्थगित केल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या अष्टपैलू बेन स्टोक्स व जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर यांना दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावे लागले असून याचवेळी मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, जोस बटलर, सॅम करण, ख्रिस वोक्स यांना इंग्लिश क्रिकेट मंडळाने विश्रांती दिली आहे.