क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
राहुल के. पी. याने इंज्युरी वेळेत केलेल्या अप्रतिम गोलमुळे केरळ ब्लास्टर्सने बेंगलोर एफसीचा पराभव करून आयएसएल फुटबॉल स्पर्धेत शानदार विजय नोंदविला. बुधवारी हा सामना बांबोळीतील जीएमसी मैदानावर खेळविण्यात आला. ब्लास्टर्सने पिछाडीवरून बेंगलोरला भेदले.
केरळ ब्लास्टर्ससाठी लालथातहांगा आणि के. पी. राहुलने तर बेंगलोरचा एकमेव गोल क्लिटॉन सिल्वाने केला. या विजयाने ब्लास्टर्सला तीन गुण प्राप्त झाले. बाराव्या सामन्यांतील त्यांचा हा तिसरा विजय ठरला. त्यांचे आता चार बरोबरी व पाच पराभवाने 13 गुण झाले. बेंगलोरचा मागील सहा सामन्यांतील हा पाचवा पराभव. त्यांचे आता 12 सामन्यांतून तीन विजय व चार बरोबरीने 13 गुण झाले.
सामन्याच्या पहिल्या सत्रातील खेळावर दोन्ही संघांचे समान वर्चस्व सामन्यावर आढळून आले. पहिला गोल जरी बेंगलोर एफसीने नोंदविला असला, तरी केरळ ब्लास्टर्सने आरंभाच्या खेळावर वर्चस्व ठेवले. सामन्याच्या 24 व्या मिनिटाला क्लिटॉन सिल्वाने राहुल भेकेच्या पासवर गोलरक्षक आल्बिनो गोम्सला भेदले व चेंडू जाळीत टोलविला.
या गोलनंतर बेंगलोर एफसीने केरळ ब्लास्टर्सच्या बचावफळीला चांगलेच जेरीस आणले. बेंगलोरने या सामन्यात काऊंटर ऍटॅकद्वारे ब्लास्टर्सवर चांगलाच दबाव आणला. पहिल्या सत्रातच बेंगलोर एफसीला आपली आघाडी दोन गोलांनी वाढविण्याची संधीही मिळाली होती. यावेळी सुनील छेत्रीने हाणलेला फटका आल्बिनो गोम्सने झेपावत बाहेर टाकला.
त्यापूर्वी सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला बेंगलोरच्या एरीक पार्तालूने हाणलेला फटका ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनोच्या सरळ हातात गेला होता. अकराव्या मिनिटाला उदांता सिंगने एक दिशाहीन फटका हाणल्याने परत एकदा बेंगलोरची गोल करण्याची संधी हुकली. ब्लास्टर्सने सामन्यातील आपली पहिली धोकादायक चाल 24 व्या मिनिटाला केली. मात्र यावेळी त्यांचा आघाडीपटू गॅरी हूपरचा फटका गोलच्या आडव्या पट्टीवरून गेला.
दुसऱया सत्रात 73 व्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्सने बरोबरी साधणारा गोल केला. यावेळी गॅरी हूपरने अगदी जवळून हाणलेला फटका बेंगलोरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंगच्या तोंडाला आदळला. या फटक्याने गुरप्रीत खाली पडला. त्याला लागून आलेल्या चेंडूवर ताबा घेत बदली खेळाडू लालथातहांगाने ब्लास्टर्सचा बरोबरीचा गोल केला. इंज्युरी वेळेत राहुल केपी याने अप्रतिम गोल नोंदवून केरळ ब्लास्टर्सला विजयी केले