वृत्तसंस्था/ थिरूवनंतपूरम
इंडियन ग्रां प्रि 2 ऍथलेटिक्स स्पर्धेला येथील चंद्रशेखरन नायर पोलीस स्टेडियमवर बुधवारपासून प्रारंभ होणार असून भारताचे अविनाश साबळे आणि कमलप्रित कौर प्रमुख आकर्षण आहेत. या स्पर्धेत या दोन्ही ऍथलीटस्चे पुनरागमन होत आहे.
भारताचा धावपटू अविनाश साबळेने पुरूषांच्या 3000 मी. स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. टोकियो ऑलिंपिकसाठी झालेल्या चाचणी फेरीत त्याने 8 मिनिटे, 18.12 सेकंदाचा अवधी नोंदविला होता. त्याचप्रमाणे भारताची थाळीफेक ऍथलीट कमलप्रित कौरने पात्रता फेरीमध्ये 63.70 मी.ची नोंद करत ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली होती. हे दोन्ही ऍथलीटस् गेल्या वर्षीच्या ऑगस्टनंतर पहिल्यांदाच ऍथलेटिक्स क्षेत्रात या स्पर्धेद्वारे पुनरागमन करीत आहेत. बुधवारपासून सुरू होणाऱया स्पर्धेत महिलांच्या 400 मी. धावण्यांच्या शर्यतीत जिस्ना मॅथ्यू आणि व्हिके विस्मया यांच्या कामगिरींकडे अधिक लक्ष राहील. गेल्या महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या आंतरविद्यापीठ ऍथलेटिक्स स्पर्धेत प्रिया मोहनने 52.59 सेकंदाचा अवधी घेतला होता तर 13 मार्च रोजी झालेल्या इंडियन ग्रां प्रि-1 ऍथलेटिक्स स्पर्धेत प्रियाने 52.91 सेकंदाचा अवधी नोंदविला होता.