प्रतिनिधी/ पणजी
कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेला 51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजीत 16 ते 24 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातील महत्त्वाचा मानला जाणाऱया इंडियन पॅनोरमा विभागात 23 चित्रपट तर 20 नॉन फिचर चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या विभागाचे उद्घाटन तुषार हिरनंदानी दिग्दर्शित ‘सांड की आँख’ चित्रपटाने होणार आहे.
यंदाच्या इंडियन पॅनोरमावर मल्याळम भाषेतील सिनेमांचे संपूर्ण वर्चस्व दिसत असून सिनेमा आणि लघुपट मिळून एकूण सहा मल्याळम दर्जेदार सिनेमांचा आस्वाद रसिकांना आंचिममध्ये घ्यायला मिळणार आहे. मागीलवर्षीप्रमाणे यंदाही सदर विभागात मल्याळम सिनेमांनी आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. यावर्षी मल्याळममधून प्रदीप कलीपुरयथ दिग्दर्शित सेफ, अन्वर रशिद दिग्दर्शित ट्रान्स, निसाम बशीर दिग्दर्शित केट्टीयोलानू एन्टे मलखा, सिद्दक परवूर दिग्दर्शित ताहिरा, मुहम्मद मुस्तफा दिग्दर्शित कपेला या पाच सिनेमांचा आणि शरण वेणुगोपाळ दिग्दर्शित ‘ओरू पथिरा स्वप्नम पोळे’ या लघुपटाची निवड झाली आहे.
मल्याळमसोबत मराठी सिनेमासुद्धा या यादीमध्ये तीन सिनेमा आणि तीन लघुपटांसह महत्त्वाचे स्थान पटकाविले आहे. यामध्ये वैभव किश्ती, सुऋद गोडबोले दिग्दर्शित जून, शषांक उडारपूरकर दिग्दर्शित प्रवास, मंगेश जोशी दिग्दर्शित कारखानीसांची वारी या सिनेमांची आणि राज मोरे दिग्दर्शित खिसा, हिमांशू सिंह दिग्दर्शित पांढरा चिवडा, ओंकार दिवाडकर दिग्दर्शित लघुपटाचा समावेश आहे.