सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
माळमारूती स्पोर्ट्स क्लब आयोजित सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात इंडियन बॉईज संघाने एमसीसी मच्छे संघाचा 24 धावानी तर सीसीआय संघाने एम. ट्रीपल्स ए वन संघाचा 5 गडय़ानी पराभव करून प्रत्येकी 3 गुण मिळविले. माजीद मकानदार (इंडियन बॉईज) जिनत मुडबागील (सीसीआय) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंडियन बॉईज संघाने 20 षटकात सर्व बाद 165 धावा केल्या. त्यात माजीद मकानदारने 9 षटकार, 5 चौकारासह 30 चेंडूत 86 तर जावेद फनिबंदने 26 धावा केल्या. एमसीसीतर्फे दादापीरने 34 धावात 4 तर गौस हाजीने 22 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एमसीसी मच्छेने 20 षटकात 4 बाद 141 धावाच केल्या. त्यात शिवप्रसाद हिरेमठने 41 तर गौस हाजीने 31 धावा केल्या. इंडियन बॉईजतर्फे माजिद मकानदारने 20 धावात 2 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात एम. ट्रीपल ए वन संघाने 20 षटकात 9 बाद 136 धावा केल्या. त्यात तारीक पटवेगारने 29, फिरदोसने 20, अभिषेक देसाईने 11 धावा केल्या. सीसीआयतर्फे रणजित पाटीलने 14 धावात 3, जिनतने 22 धावात 2, जावेदने 23 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल सीसीआयने 15 षटकात 5 बाद 144 धावा करून सामना 5 गडय़ानी जिंकला. जिनत मुडबागीलने 2 षटकार, 5 चौकारासह 62, प्रभु सालसट्टीने 38 धावा केल्या. ट्रीपलतर्फे तारिकने 11 धावात 2 गडी बाद केले.