वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या इंडियन वेल्स मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने एकेरीचे जेतेपद मिळविताना स्पेनच्या चौथ्या मानांकित राफेल नदालचा धक्कादायक पराभव केला. या पराभवामुळे नदालची या वर्षातील सलग 20 सामन्यांची विजयी घोडदौड खंडीत झाली असून त्याला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रिट्झने नदालचा 6-3, 7-6 (7-5) असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. या लढतीमध्ये नदालकडून 34 तर फ्रिट्झकडून 22 अनियंत्रित चुका नोंदविल्या गेल्या. 2001 नंतर या स्पर्धेत अमेरिकन टेनिसपटू फ्रिट्झने पहिल्यांदा विजेतेपद पटकाविले आहे. 2001 साली अमेरिकेच्या आंद्रे ऍगास्सीने विजेतेपद मिळविले होते. 21 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदाचा विक्रम करणाऱया नदालला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.