वृत्तसंस्था/लॉस एंजेल्स
इंडियाना वेल्समध्ये होणारी बीएनपी पेरिबस ओपन टेनिस स्पर्धा येत्या मार्चमध्ये कॅलिफोर्नियात घेण्याचे ठरले होते. पण कोरोना महामारीच्या कारणास्तव ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली असल्याचे एटीपीने सांगितले.
इंडियाना वेल्स ही चार ग्रँडस्लॅम स्पर्धांनंतर टेनिस सर्किटमधील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. पण सलग दुसऱया वर्षी या स्पर्धेवर कोरोनाचा प्रभाव पडला आहे. यावर्षी ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. ‘कोव्हिड 19 च्या प्रभावामुळे इंडियाना वेल्समधील बीएनपी पेरिबस ओपन स्पर्धा मार्चमधील नियोजित तारखेला आयेजित करणे शक्य होणार नाही,’ असे एटीपीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘ही स्पर्धा भरविण्यासाठी पर्यायी तारखांचा आढावा घेतला जात आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढील वर्षी 8 ते 21 मार्च या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अनेक अव्वल पुरुष व महिला टेनिसपटू सहभागी होण्यास उत्सुक असतात. एटीपी व डब्ल्यूटीए टूर्स यांच्याशी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात येत असून त्याची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.