नवी दिल्ली : देशातील रेटिंग्स एजन्सी इंडिया रेटिंग्सने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट (जीडीपी) संदर्भातील अंदाज पुन्हा एकदा घटविला आहे. याआधीच्या 9.6 टक्क्याऐवजी आता जीडीपी 9.4 टक्के राहणार असल्याचा अंदाज इंडिया रेटिंग्सने मांडला आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव काही प्रमाणात ओसरत असल्याच्या कारणास्तव बाजारातील विविध टप्प्यांवरील व्यवसाय व व्यापारात गती प्राप्त होत असल्याचा फायदा हा आर्थिक वाढीला पोषक ठरणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. याच्या व्यतिरिक्त काही अन्य क्षेत्रात रिकव्हरी राहिल्याने निर्यातीचा टक्का वाढल्याचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला होणार असल्याची माहिती दिली आहे.
अर्थव्यवस्थेची मजबूती लसीकरणावर अवलंबून देशात सुरु असणारे विविध वयोमानानुसार लसीकरण व त्याचा दिवसागणित वाढत जाणारा वेग हाच येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत स्थिती प्राप्त करण्यासाठी मदत करणार असल्याचे मत इंडिया रेटिंग्स एजन्सीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ सुनील कुमार सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. लसीकरण वेगाने झाल्यास अर्थव्यवस्थेत अपेक्षीत सुधारणा होऊ शकतील.