इंग्लंड लेजेंड्सचा 6 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ रायपूर
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया लेजेंड्स संघाला रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज टी-20 स्पर्धेत पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी मने जिंकणारी कामगिरी त्यांच्याकडून झाली. मंगळवारी येथील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर रोमांचक ठरलेल्या सामन्यात इंग्लंड लेजेंड्स संघाकडून त्यांना केवळ 6 धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला.
189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया लेजेंड्सची आघाडी फळी झटपट कोसळली. मात्र अष्टपैलू इरफान पठाण (34 चेंडूत 4 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 61) व मनप्रीत सिंग गोनी (16 चेंडूत 1 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 35) यांनी जोरदार फटकेबाजी करीत विजयाची आशा निर्माण केली होती. पण शेवटी त्यांना सहा धावा कमी पडल्या. शेवटच्या दोन षटकांत इंडिया लेजेंड्सला 38 धावांची गरज असताना ख्रिस ट्रेम्लेटच्या 19 व्या षटकांत गोनीने एकटय़ाने 19 धावा फटकावताना दोन षटकार, एक चौकार मारला. मात्र शेवटच्या षटकात त्यांना केवळ 12 धावाच जमविणे शक्य झाले. 20 षटकांत 7 बाद 182 धावांपर्यंतच मजल मारता आल्याने त्यांनी 6 धावांनी सामना गमविला.
दुसरा विजय मिळविणाऱया इंग्लंडच्या डावात कर्णधार केविन पीटरसन स्टार ठरला. त्याने 37 चेंडूत 6 चौकार, 5 षटकारांसह 75 धावांचे योगदान दिले. याशिवाय डरेन मॅडीने 29 धावा केल्या. इरफान पठाण, मुनाफ पटेल यांनी प्रत्येकी 2 तर युसूफ पठाणने 3 बळी मिळविले. भारतातर्फे सेहवाग (6), सचिन तेंडुलकर (9), कैफ (1) एकेरी धावांत बाद झाले तर युवराज सिंगने 22, युसूफ पठाणने 17 धावा केल्या. इंग्लंडच्या माँटी पनेसरने 3 तर ट्रेम्लेटने 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड लेजेंड्स 20 षटकांत 7 बाद 188, इंडिया लेजेंड्स 20 षटकांत 7 बाद 182.