41 कैद्यांचा मृत्यू – 39 जण होरपळल्याने जखमी
वृत्तसंस्था / जकार्ता
इंडोनेशियाची राजधानी जकार्तानजीक बुधवारी पहाटे एका तुरुंगात आग लागल्याने किमान 41 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. तर 39 कैदी होरपळल्याने जखमी झाले आहेत. ही आग राजधानी नजीकच्या तांगेरांग तुरुंगातील ‘सी’ ब्लॉकमध्ये लागली होती. या तुरुंगात अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित गुन्हेगारांना ठेवण्यात येते. अधिकारी आगीमागील कारणांचा शोध घेत आहेत.
या तुरुंगाची क्षमता 1,225 कैद्यांना सामावून घेण्याची आहे, पण तेथे 2 हजारांहून अधिक कैद्यांना ठेवण्यात आले होते. आगीच्या घटनेवेळी तुरुंगाच्या ‘सी’ ब्लॉकमध्ये 122 कैदी हाते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि सैनिकांची मदत घेण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आणि जखमी कैद्यांना रुग्णालयात हलविण्यात आल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.
इंडोनेशियात तुरुंग फोडणे किंवा अन्य दुर्घटनांच्या घटना वारंवार घडत असतात. तुरुंगात क्षमतेहून अधिक कैदी ठेवले जात असल्याने अशाप्रकारच्या घटना घडतात. तुरुंगांना सरकारकडून पुरेसा निधी मिळत नाही आणि प्रतिदिन अमली पदार्थांच्या विविध प्रकरणांमध्ये कित्येकांना अटक केली जाते. सप्टेंबरमधील शासकीय आकडेवारीनुसार तांगेरांग तुरुंगात 2 हजारांहून अधिक कैदी होते. हा आकडा या तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा खूपच अधिक आहे.