जकार्ता / वृत्तसंस्था
इंडोनेशियाला शुक्रवारी भूकंपाचे मोठे धक्के बसले. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. भूकंपाच्या हादऱयामुळे विविध भागात घरे-इमारतींची मोठी पडझड झाली असून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत 34 जणांचे बळी गेल्याची माहिती सरकारी सूत्रांनी जाहीर केली. तसेच 600 हून अधिक लोक जखमी झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या भूकंपामध्ये एका मोठय़ा रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इंडोनेशियात शुक्रवारी झालेल्या भूकंपात सुलावेसी बेटावरील रुग्णालयाची इमारत कोसळली आहे. इमारतीच्या ढिगाऱयाखालून सायंकाळपर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मामुजू शहरामध्ये ही दुर्घटना घडली आहे. रुग्णालय इमारतीच्या ढिगाऱयाखाली रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी अडकले आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे मदत व बचाव पथकाकडून सांगण्यात आले. मात्र नक्की किती रुग्ण आणि कर्मचारी या इमारतीच्या ढिगाऱयाखाली अडकलेत यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही.
या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ असणाऱया सुलावेसी शहराला सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मदतकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा पहिला मोठा धक्का जाणवला. सात सेकंदांपर्यंत हा भूकंपाचा झटका जाणवला. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र समुद्रकिनाऱयावर सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गुरुवारीही इंडोनेशियातील काही ठिकाणी भूकंपाचे मध्यम स्वरुपाचे झटके जाणवले होते.
भूकंपानंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत. यामध्ये लोक आपल्या घरातून बाहेर पळत येताना दिसत आहेत. रस्त्यांच्या आजूबाजूला मोडून पडलेल्या घरांचे ढिगारे या व्हिडीओंमध्ये दिसत आहेत. 60 हून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी जारी केली आहे.