जगभरात 46,44,998 कोरोनाबाधित : ब्राझीलमध्ये 14,962 बळी
जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत 46,44,998 जणांना झाला आहे. तर 17,69,919 बाधितांनी या संसर्गावर मात केली आहे. जगातील एकूण बळींचा आकडा आता 3,08,964 वर पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये बळींचा आकडा 15 हजारांच्या समीप पोहोचला आहे. तर इंडोनेशियात येणाऱया प्रवाशांना आता आरोग्य प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. हा नियम विदेशी प्रवाशांसह तेथील नागरिकांवरही लागू होणार आहे.
अमेरिकेत 1,680 बळी
अमेरिकेत मागील 24 तासांत 1,680 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील मृतांची संख्या 88,507 वर पोहोचली आहे. तर 14,84,287 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. न्यूयॉर्क प्रांतात 27 हजार जणांना जीव गमवावा लागला असून 3 लाख 56 हजारांपेक्षा अधिक जणांना बाधा झाली आहे. प्रांतात 13 जूनपर्यंत स्टे-ऍट होम आदेश बजावण्यात आला आहे. 1 जूनपर्यंत देशातील कोरोना बळींचा आकडा 1 लाखाहून अधिक होणार असल्याचे सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे संचालक डॉ. रॉबर्ट रेडफिल्ड यांनी म्हटले आहे.
भारताला व्हेंटिलेटर पुरवू
अमेरिकेचा मित्रदेश भारताला व्हेंटिलेटर पुरविले जाणार आहेत. महामारीच्या काळात भारत आणि नरेंद्र मोदींसोबत उभे आहोत. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करत आहोत. दोन्ही देश मिळून या अदृश्य शत्रूला पराभूत करतील असे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. कोरोनावरील प्रभावी लस विकसित केल्यावर ती जनतेला मोफत उपलब्ध करण्यासंबंधी विचार केला जाईल. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत लस विकसित केली जाऊ शकते. लस निर्मितीसाठी ‘ऑपरेशन वार्प स्पीड’ नावाची नवी मोहीम सुरू करण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले.
ब्राझीलमध्ये 15,305 नवे रुग्ण
ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासांत देशात 15,305 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या 2,20,291 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार एका दिवसात 824 जणांचा मृत्यू झाला आहे. एक दिवसापूर्वी देशात 13 हजार 944 रुग्ण सापडले होते. याचदरम्यान ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी सोमवारी टाळेबंदीचे नियम शिथिल करत व्यायामशाळा, ब्युटी पार्लर आणि सलून सुरू करण्याची अनुमती दिली आहे. बोल्सोनारो यांच्याशी टाळेबंदीवरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे एक महिन्यात आणखी एका आरोग्यमंत्र्याने राजीनामा दिला आहे.
इटली : विदेशप्रवासास अनुमती
इटली 3 जूनपासून आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी हटविणार आहे. इटलीत आता लोकांची अन्य देशांमधून ये-जा सुरू होणार आहे. 3 जूनपासून देशांतर्गत प्रवासाची अनुमती दिली जाणार आहे. इटलीत आतापर्यंत 31,610 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात 2 लाख 23 हजार 885 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर इटलीतच सर्वाधिक बळी गेले आहेत. दिवसभरात देशात 242 जणांना जीव गमवावा लागला असून 700 हून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. 18 मेपासून इटलीत सर्व व्यवहार सुरू होणार आहेत.
चीनमध्ये 21 नवे रुग्ण
चीनमध्ये दिवसभरात 21 नवे रुग्ण सापडले आहेत. यातील 13 रुग्णांमध्ये कुठलीच लक्षणे दिसून आली नव्हती. तर वुहानच्या 1.1 कोटी लोकांची चाचणी सुरू करण्यात आली आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननुसार 6 नवे रुग्ण विदेशातून आलेले नागरिक होते. देशात आतापर्यंत 82,941 बाधित सापडले असून 4,633 जणांना जीव गमवावा लागला आहे.
रशिया : प्रतिजैवकांसाठी स्क्रीनिंग
रशियात प्रतिजैवकांसाठी व्यापक स्तरावर लोकांचे स्क्रीनिंग सुरू करण्यात आले आहे. याकरता विविध वयोगटातील लोकांना मॉस्कोच्या रुग्णालयात पाचारण केले जात आहे. लोकांचे रक्तनमुने प्राप्त करून प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. या चाचणीकरता 30 हून अधिक क्लीनिक्स काम करत आहेत. देशात आतापर्यंत 2,72,043 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2,537 जणांचा मृत्यू झाला आहे.