ऑनलाईन टीम / जकार्ता :
पूर्व इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांना आलेला महापूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी आहेत. पूर्व इंडोनेशिया आणि शेजारील तिमोर लेस्ट परिसराला पुराचा फटका बसला असून, चार उपजिल्हे आणि सात गावं पुराच्या केंद्रस्थानी आहेत.
इंडोनेशिया डिझॅस्टर मिटिगेशन एजन्सीचे प्रवक्ते रादित्य जाती यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापूरामुळे इंडोनेशियाच्या पूर्व भागातील लामेनेले गावावर डोंगराचा काही भाग कोसळून अनेक घरे गाडली गेली आहेत. बचाव पथकाने मातीच्या ढिगाऱ्याखालून 38 मृतदेह बाहेर काढले आहेत. तर 5 जण जखमी आहेत. इतर बेपत्ता लोकांचा शोध बचाव पथकांकडून सुरू आहे.
तिमोर लेस्ट परिसरात पुरामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. पूरग्रस्त भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.