महाराष्ट्र संघाची होणार निवड
औंध / प्रतिनिधी :
अमेठी ( उत्तरप्रदेश ) येथे होणाऱ्या 23 वर्षाखालील तिसरी फ्री- स्टाईल , ग्रीको रोमन मुले व मुली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी 4 व 5 सप्टेंबर रोजी कै. रंगनाथ मारकड कुस्ती केंद्र इंदापूर, जि. पुणे येथे होणार असल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, 4 सप्टेंबर रोजी फ्रीस्टाईल प्रकाराची निवड चाचणी होईल. तसेच 5 सप्टेंबर रोजी ग्रीकोरोमन आणि मुलींच्या संघाची निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येईल. शासनाच्या कोविडबाबतीत मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठीची महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या संघाची निवड चाचणी घेण्यात येईल. चाचणीच्या ठिकाणी सहभागी खेळाडू व अधिकृत पंच या व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश मिळणार नाही. निवड चाचणी स्पर्धा सर्व कुस्तीशौकिन पालक व प्रशिक्षक यांच्या साठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या फेसबुक पेज व यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे .