मध्यप्रदेशच्या इंदोर शहरात गुरुवारी आणखी दोन जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. 65 वर्षीय महिला तसेच 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील एकूण बळींचा आकडा आता वाढून 8 झाला आहे. इंदोरमध्ये 5, उज्जैनमध्ये 2 आणि खरगोनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राज्यात इंदोरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी रात्री उशिरा 12 नवे रुग्ण आढळून आल्याने शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता 75 झाली आहे. यातील 56 जणांच्या संसर्गाचा स्रोत समजू न शकल्याने स्थिती गंभीर होत चालली आहे.
सरकारने इंदोरमध्ये आरोग्य विभागाच्या पथकावरील हल्ल्याचा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आरोग्य आयुक्त प्रतीक हजेला यांना पदावरून हटवत आयएएस अधिकारी अहमद किडवाई यांची नियुक्ती केली आहे.
शहरात कोरोना विषाणूचा स्रोत समजत नसल्याने समूह संसर्ग सुरू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. विदेशात कधीच न गेलेले तसेच प्रवासाचा इतिहास नसलेल्या लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी तबलिगी जमातमध्ये सामील लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचे निर्देश दिले असून जिल्हा पातळीवर आढावा घेण्याचा आदेश आहे. तबलिगीमध्ये सामील 107 नागरिकांची यादी प्राप्त झाली होती. 67 नागरिकांना विलग करण्यात आले आहे. उर्वरित 40 जमातींची नावे आणि पत्ते माहित नसल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे.