हॅकरकडून देशविरोधी संदेश प्रसारित – मोदींबद्दलही आक्षेपार्ह टिप्पणी
वृत्तसंस्था/ इंदोर
मध्यप्रदेशातील इंदोर पोलिसांची सरकारी वेबसाइट (संकेतस्थळ) हॅक करण्यात आली आहे. हॅकर्सनी पोलीस महासंचालकानंतर अतिरिक्त पालीस अधीक्षकांच्या नावासमोर हॅक्ड बाय मोहम्मद बिल्ला फ्री काश्मीर आणि पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर लिहिला आहे. तर राज्यातील पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या प्रोफाइलच्या जागी तिरंगा ध्वजाला चुकीच्या पद्धतीने दर्शविण्यात आले आहे. या प्रकारानंतर स्पेशल टीम वेबसाइटवरील नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.
हॅकिंगचा प्रकार समोर येताच इंदोर गुन्हे शाखेची सायबर टीम सक्रीय झाली आहे. संकेतस्थळ रिकव्हर करण्यासह हॅकर्सची माहिती जमविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोहम्मद बिलाल नावाच्या पाकिस्तानी हॅकरने यापूर्वी दिल्ली भाजपची वेबसाइट हॅक केली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये दिल्ली भाजपची वेबसाइट हॅक करून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात आला होता.
एप्रिल 2018 मध्ये देखील आंध्र विद्यापीठाची वेबसाइट बिलालनेच हॅक केली होती. 15 ऑक्टोबर 2018 मध्ये गोव्यातील भाजपच्या वेबसाइट हॅकिंगमध्येही बिलाल आणि त्याच्या पीसीआय टीमचा होता.
इंदोर पोलिसांची वेबसाइट सध्या दुरुस्त करण्याचे काम केले जात आहे. ज्या आयपी ऍड्रेसद्वारे या वेबसाइटला हॅक करण्याचा प्रयत्न झाला, तो ट्रेस करण्याचे काम सुरू आहे. सध्या पेज पूर्णपणे ब्लॉक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुरु पराशर यांनी दिली आहे.