पेट्रोल 26 ते 29 तर डिझेल 30 पैशांनी महागले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ न होता ते स्थिर राहिल्यामुळे दर कमी होण्याची काहीशी आशा निर्माण झालेली असतानाच रविवारी पुन्हा दरवाढ झाली. रविवारी पेट्रोलचा दर 26 ते 29 पैशांनी तर डिझेलची किंमत 30 पैशांनी वाढली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये रविवारी पेट्रोल प्रतिलिटर 97 रुपये 22 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 87 रुपये 97 पैसे दराने विकले जात होते. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलसाठी मुंबईकरांना प्रतिलिटर 103 रुपये 36 पैसे तर डिझेलसाठी 95 रुपये 44 पैसे मोजावे लागत होते. मध्यप्रदेशमधील भोपाळमध्ये हेच दर अनुक्रमे 105 रुपये 43 पैसे आणि 96 रुपये 65 पैसे या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
राज्यांचा विचार करता गेल्या दीड ते दोन महिन्यांत झालेल्या पेट्रोल दरवाढीमुळे देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलचे भाव शंभरीच्या वर गेले आहेत. यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे. राज्यांच्या राजधान्यांमध्ये सर्वात आधी भोपाळमध्ये पेट्रोल दरांनी शंभरी पार केली. त्यापाठोपाठ जयपूर, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळूरचाही यामध्ये समावेश झाला आहे.
दीड महिन्यात 27 वेळा दरवाढ
देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. गेल्या दीड-पावणेदोन महिन्यात 27 वेळा इंधन दरवाढ झाल्याने वाहनधारकांच्या खिशावर ताण पडत चालला आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल दरात प्रतिलिटर 6.83 रुपयांची तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 7.24 रुपयांनी वाढ झाली आहे. आधीच कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे हैराण झालेल्या जनतेला आता इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईचा दुहेरी सामना करावा लागत आहे.