राजस्थानात पेट्रोल ‘शंभरी’पार – मुंबईत 93 रुपयांच्या जवळपास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये शुक्रवारी कोणतेही बदल केले नसले तरी गेल्या काही दिवसात होत असलेल्या दरवाढीमुळे वाहनधारकांच्या खिशावर ताण पडलेला दिसत आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 86.30 रुपये होता. मात्र दोन दिवसांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी किंमती वाढवल्यानंतर अनेक शहरांमध्ये किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. कंपन्यांच्या दरात वाढ झाल्याने मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 93 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. तर राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा दर 101 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचला आहे. चालू वर्षात 27 दिवसात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.59 रुपयांची वाढ झाली आहे. यावषी डिझेलच्या दरातही लिटरमागे 2.35 रुपयांची वाढ झाली आहे.
दिल्लीत पेट्रोल 86.35 रुपये तर डिझेल 76.48 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. तसेच मुंबईत पेट्रोल 92.86 रुपये तर डिझेल 83.30 रुपये प्रतिलिटर आहे. बेंगळूरमध्ये पेट्रोल 89.21 रुपये आणि डिझेल 81.10 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना आणखी त्रास होत आहे. महागडय़ा डिझेल व शेतकरी आंदोलनामुळे आधीच मालाचा पुरवठा कमी झाला आहे. फळे आणि भाज्यांचे दर अजूनही जास्त आहेत. दिल्लीत डिझेलचे दर सर्वकाळच्या उच्चांकापेक्षा 7 पैसे कमी आहेत. त्याचबरोबर आर्थिक राजधानी मुंबईने विक्रमी दराची पातळी ओलांडली आहे.