ऑनलाईन टीम / मुंबई :
एक दिवस आड पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा कायम ठेवला आहे. सोमवारी इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही इंधनाच्या किमतीत वाढ केली आहे. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 25 पैशांनी महाग झाले आहे.
दरम्यान, काल सोमवारी इंधन दर स्थिर होते तर रविवारी पेट्रोल 17 पैसे आणि डिझेल 27 पैशांनी महागले होते.तर शनिवारी इंधन दरात कोणताही बदल झाला नाही.
आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 99.71 रुपयांवर गेला आहे. मुंबईत पेट्रोल शंभरी गाठण्यापासून आता केवळ एक पाऊल दूर आहे. तर एक लीटर डिझेलचा भाव 91.57 रुपये आहे.
दिल्लीत पेट्रोल 93.44 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 84.32 रुपये आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोल 95.06 तर डिझेल 89.11 रुपये प्रती लीटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव प्रती लीटर 93.49 आणि डिझेल 87.46 रुपये इतके आहे.