ऑनलाईन टीम / मुंबई :
कर्नाटकातील कॉलेजमधून सुरू झालेला हिजाब वाद आता थांबण्याचे नाव घेत नसून, परिस्थिती चिघळताना दिसत आहे. नेत्यांमधील वाक् युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आणि पुन्हा वाद निर्माण केला. त्यांनी व्हिडिओ ट्विट करत लिहिले की, इंशा अल्लाह… एक दिवस हिजाबी पंतप्रधान होईल.
ट्विटमधील व्हिडिओत ओवैसी म्हणतात की, जर आमच्या मुलींनी ठरवले अब्बा-अम्मी मी हिजाब घालेन. तर अम्मी-अब्बा म्हणतील, घाल बेटा, तुला कोण अडवते ते आम्ही बघू. तसेच ती हिजाब घालून कॉलेजला जाईल, ती कलेक्टर, बिझनेसमन, एसडीएम बनेल आणि एक दिवस ती हिजाब घालून पंतप्रधान होईल.
भारतीय राज्यघटनेने हिजाब घालण्याचा अधिकार दिला
याआधी ओवैसी यांनी हिजाब वादात पुट्टस्वामी निकालाचा दाखला दिला होता. ओवेसी म्हणाले होते, भारतीय संविधानाने चादर, मास्क किंवा हिजाब घालावा असा अधिकार दिला आहे… पुट्टास्वामींचा निकाल आपल्याला हे करण्यास अनुमती देतो. ही आमची ओळख आहे.